राजकोट : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमधील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सत्ताधारी पक्षातच राहून आम आदमी पार्टीचे (आप) काम करण्याचे आवाहन केले.
आपचे राष्ट्रीय संयोजक केजरीवाल यांनी आपल्या दोनदिवसीय गुजरात दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी राजकोटमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप कार्यकर्त्यांना हे आवाहन केले. भाजपा कार्यकर्त्यांनी पक्षाकडून रसद मिळवणे सुरू ठेवावे. मात्र, तेथे राहूनच त्यांनी ‘आप’साठी काम करावे. राज्यात आपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनाही सामान्य नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा लाभ मिळेल.
भाजपाने आपले कार्यकर्ते आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नि:शुल्क व दर्जेदार शिक्षण, आरोग्य सेवा, मोफत वीज यासारख्या सुविधा दिल्या नाहीत. मात्र, आम आदमी पार्टी त्यांच्या कल्याणाची काळजी घेईल. भाजपा कार्यकर्ते आपल्या पक्षात राहूनच आपचे काम करू शकतात. यातील अनेकांना भाजपाकडून पैसे मिळतात. त्यामुळे त्यांच्याकडून पैसे घ्या, पण काम आमच्यासाठी करा. कारण, आमच्याकडे पैसे नाहीत, असेही केजरीवाल म्हणाले.
- गुजरातमध्ये आमचे सरकार सत्तारूढ झाल्यास आम्ही मोफत वीज देणार आहोत आणि ती भाजप कार्यकर्त्यांनाही मिळेल. आम्ही तुम्हाला २४ तास नि:शुल्क वीज पुरवू, तुमच्या मुलांसाठी चांगल्या शाळा उभारू, तेथे त्यांना नि:शुल्क शिक्षण मिळेल. - आम्ही तुमच्या कुटुंबीयांसाठी नि:शुल्क दर्जेदार वैद्यकीय उपचाराची सुविधा उपलब्ध करून देऊ, असेही केजरीवाल म्हणाले. - आपचे गुजरातमधील नेेते मनोज सोरथिया यांच्यावर अलीकडेच झालेल्या हल्ल्याचा उल्लेख करून केजरीवाल यांनी आपला पाठिंबा दिल्यामुळे गुजरातमधील अनेक लोकांवर आणखी हल्ले होतील, अशी भीती व्यक्त केली.