पणजी : नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), तिहेरी तलाक, काश्मिरचे 370 कलम असे अनेक प्रश्न गेली सत्तर वर्षे सुटले नव्हते पण मोदी सरकारने ते सोडवले. लोकांनी व भाजप कार्यकर्त्यांनी या निर्णयांसोबत व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ठामपणे रहावे. विरोधक देशाला व सरकारलाही अस्थिर करू पाहत आहेत पण तुम्ही सरकार अस्थिर होऊ देऊ नका असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी बुधवारी येथे केले.
गोव्यातील काही चार्टड अकाऊण्टंट्स, सामाजिक कार्यकर्ते, प्रमुख भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याशी पात्र यांनी पणजीत संवाद साधला. सध्याचा भारत हा नवा भारत आहे व त्याचदृष्टीकोनातून मोदी सरकारने देशाला चांगला अर्थसंकल्प कसा दिला हे स्पष्ट करण्यासाठी संबित पात्रा गोव्यात आले आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, विनय तेंडुलकर आदी यावेळी व्यासपीठावर होते.
देशाची अर्थव्यवस्था चांगली आहे असे नमूद करून संबित पात्रा म्हणाले, की अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठीच देशभर साधनसुविधांचे जाळे विणले जात आहे. मोदी चांगले काम करत आहेत पण देशातील काही विरोधी शक्ती मोदींना विरोध करता करता देशाला विरोध करू लागल्या आहेत. स्व. राजीव गांधी यांच्या सरकारला काही शक्तींनी शहाबानो प्रकरणी ब्लॅकमेल करून निर्णय फिरवायला भाग पाडले होते. सीसीएप्रश्नीही तशाच प्रकारे या शक्ती मोदी सरकारला ब्लॅकमेल करू पाहत आहेत. त्या शक्ती मोदी सरकारने माघार घ्यावी म्हणून वातावरण दुषित करत आहेत. अशावेळी तुम्ही सर्वानी एखाद्या मोठ्या अभेद्य खडकाप्रमाणो मोदी सरकारच्या मागे रहावे.
देशात आणि गोव्यातही भाजप सरकार अधिकारावर आल्यानंतरच साधनसुविधा निर्माणाच्या कामांना वेग आला. मोदी दुसऱ्यांदा प्रचंड जागा प्राप्त करून सत्तेवर आले. मोदी सरकारला जागा सहानुभूतीमुळे मिळाल्या नाही तर त्यांच्यात आपली स्वप्ने साकार करणारे नेतृत्व देशाने पाहिले व त्यांच्या नेतृत्वाला मते दिली. काश्मिरमध्ये 370 कलम हटविले गेल्यामुळे आज काश्मिरात शांतता आहे. 73 टक्के सैनिकांचे प्राण त्यामुळे वाचले आहेत.
70 वर्षे जे प्रश्न सुटले नाहीत, ते प्रश्न सोडविण्यास मोदी यांनी प्राधान्य दिले. तसे प्राधान्य दिले नसते तर त्यांना निवडणुकीवेळी मिळालेल्या प्रचंड बहुमताचा व जनमताचा तो विश्वासघात ठरला असता, असे संबित पात्रा म्हणाले. देशाला उर्जा असलेला तपस्वी पंतप्रधान लाभला आहे. त्यामुळेच अमेरिका देखील भारताचा सन्मान करते. ट्रम्प यांनी मोठी परिपक्वता दाखवली व त्यांनी सीएएवर विरोधी भाष्य करणो टाळले, असेही संबित पात्रा यांनी नमूद केले.