लखनौ - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध सुरूच आहे. ''उद्धव ठाकरेंना वास्तव माहिती नाही. त्यामुळे मला त्यांच्याकडून शिष्टाचार शिकण्याची गरज नाही. अभिवादन कशा पद्धतीनं करतात हे मला चांगले कळते. त्यामुळे याबाबत उद्धव ठाकरेंकडून मला शिकण्याची गरज नाही'', असं म्हणत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे.
पालघरच्या प्रचारात रंगली उद्धव ठाकरे आणि योगींची जुगलबंदी पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान योगी आदित्यनाथांनी पायात चपला घालून शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अपर्ण करत शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. या आरोपाला योगी आदित्यनाथ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
दरम्यान, ''शिवसेनेचा भगवा झेंडा सगळ्यांहून वेगळा आहे. योगी आदित्यनाथांसारखे लोक महाराष्ट्रात येऊन प्रवचने झोडतात. मरगट्टय़ांना ‘छत्रपती’ काय ते शिकवतात व पायात खडावारूपी चपला घालून शिवरायांना पुष्पमाला चढवतात. यावर भाजपचे काय म्हणणे आहे? शिवरायांचा हा अपमान पाहून थडग्यातला अफझलखानही आनंदाने नाचत असेल'', अशा शब्दांत योगी आदित्यनाथांवर सामना संपादकीयमध्येही टीका करण्यात आली होती.