नवी दिल्ली - देशात गेल्या काही दिवसांपासून होत असलेली कोरोना रुग्णांच्या संख्येतील वाढ आणि ओमायक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत शाळा बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतला होता. त्यानंतर, पश्चिम बंगालमध्येही सरकारने कठोर नियम लागू केले आहेत. सोमवार(3 जानेवारी)पासून राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आणि कर्मचाऱ्यांची कार्यालयातील उपस्थिती 50 टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे, पुन्हा चिंता वाढली आहे. तर, दुसरीकडे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिलासादायक विधान केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत करोना रुग्णसंख्या वाढीचा दर हा ०.५ टक्क्यांवर आहे. यामुळे 'दिल्लीत ग्रेडेड रेस्पॉन्स अॅक्शन प्लान'नुसार दिल्लीत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच दिल्लीत काही गोष्टींवर बंदी घातली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. जरी बहुतेक प्रकरणांमध्ये रुग्णालयात जाण्याची गरज नसली, ऑक्सिजन नाही, आयसीयू आणि व्हेंटिलेटरची गरज नाही, तर ओमायक्रॉन संक्रमित लोक घरीच बरे होत आहेत, असं केजरीवाल यांनी यावेळी स्पष्ट होतं. त्यानंतर, पुन्हा एकदा केजरीवाल यांनी दिलासा देणारी माहिती दिली आहे.
राजधानी दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी कोरोना आणि त्याच्या उपायोजनांच्या तयारीसंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती दिली. गेल्या 3 दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या दिल्लीत तिपटीने वाढली आहे. मात्र, नागरिकांना घाबरून जाण्याचं कारण नाही. कारण, कोरोनाबाधितांचा रुग्णालयात दाखल होण्याचा दर अत्यंत कमी आहे. त्यामुळेच, दिल्लीत 99.78 टक्के बेड अद्यापही खाली आहेत. रुग्णांमध्ये अतिशय हलके लक्षणं दिसून येत आहेत. रुग्णालयात जाणाऱ्यांची संख्या न च्या बरोबरीची आहे, असेही त्यांनी सांगितले. दिल्ली सरकारने 3700 बेडची व्यवस्था केली आहे, त्यापैकी केवळ 82 बेडवर रुग्ण आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, राजधानी दिल्लीत 29 डिसेंबर रोजी कोरोना बाधितांची संख्या 2000 होती, जी आता 1 जानेवारी रोजी 6000 पर्यंत पोहोचली आहे. म्हणजे रुग्णवाढीचा दर तिप्पट आहे.