JP Nadda on HMPV : चीनमध्ये पसरलेल्या HMPV विषाणूचा इतर देशात फैलाव सुरू झाला आहे. भारतातदेखील काही बालकांना या विषाणाची लागण झाल्याचे समोर आले आहे. याबाबत आता केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी महत्वाची माहिती दिली. एचएमपीव्ही विषाणूमुळे घाबरण्याची गरज नसल्याचे नड्डांनी सांगितले आहे. तसेच, हा नवीन विषाणू नाही, 2001 मध्ये हा पहिल्यांदा आढळला होता. सरकार यासाठी तयार असून, आवश्यक ती सर्व पावले उचलली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, चीनमध्ये आढळणारा हा विषाणू भारतातही आढळून आला असून, कर्नाटक, कोलकाता आणि गुजरातमध्ये या विषाणूची लागण झालेली बालके आढळली आहेत. आरोग्य मंत्री नड्डा यांनी तज्ञांचा हवाला देत स्पष्ट केले की, एचएमपीव्ही अनेक वर्षांपासून जगभरात पसरत आहे. हा हवेतून पसरतो आणि सर्व वयोगटातील लोकांना प्रभावित करू शकतो. हिवाळा आणि ऋतू बदलाच्या सुरुवातीच्या महिन्यांत हा विषाणू अधिक पसरतो, पण याला फार घाबरण्याची गरज नाही.
परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी 4 जानेवारी रोजी आरोग्य सेवा महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एक संयुक्त देखरेख गटाची बैठक झाली. देशाच्या आरोग्य यंत्रणा आणि पाळत ठेवणारे नेटवर्क सतर्क आहेत. आम्ही कुठल्याही प्रकारच्या आव्हानांना त्वरित प्रतिसाद देण्यासाठी तयार आहोत. काळजी करण्याची गरज नाही. आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत, अशी माहितीहीदेखी जेपी नड्डांनी दिली.
एचएमपीव्ही विषाणूबद्दल तज्ञांचे मत काय आहे?या विषाणूबाबत सरकारने गांभीर्याने पावले उचलण्याची गरज आहे, असा इशारा प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. कुणाल सरकार यांनी दिला आहे. ते म्हणाले, सरकारने सावधगिरी बाळगली पाहिजे आणि या विषाणूपासून आपल्या नागरिकांचे संरक्षण केले पाहिजे. एचएमपी विषाणू हा आरएनए-असलेला विषाणू आहे, जो संसर्गजन्य असूनही, कोविड-19 सारखा गंभीर नाही. त्याच्या सामान्य लक्षणांमध्ये ताप, खोकला आणि सर्दीचा समावेश आहे.
HMPV बाबत महाराष्ट्र सरकारचा सल्लादेशातील काही राज्यांमध्ये विषाणूची ओळख पटल्यानंतर महाराष्ट्र सरकारने देखील एक निवेदन जारी केला आहे. एचएमपीव्ही हा एक सामान्य विषाणू आहे, ज्यामुळे सामान्य सर्दी सारखा संसर्ग होऊ शकतो. 2001 मध्ये नेदरलँड्समध्ये हा पहिल्यांदा आढळला होता. हा विषाणू हंगामी आहे, सामान्यतः हिवाळ्यात आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीस जास्त प्रमाणात आढळतो, असे महाराष्ट्र सरकारने म्हटले आहे.