नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून देशभरात गाजत असलेल्या न्या. लोया मृत्यू प्रकरणामुळे सुप्रीम कोर्टातील वातावरण सध्या प्रचंड तापले आहे. सोमवारी ही परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की, न्यायमूर्तींच्या खंडपीठाने याप्रकरणात बाजू मांडणाऱ्या दोन वरिष्ठ वकिलांना फटकारले. न्यायालयाला मासळी बाजाराच्या पातळीला आणून ठेवू नका, अशा शब्दांत न्यायमूर्तींनी या वकिलांना समज दिली. सुप्रीम कोर्टात काल याप्रकरणाची सुनावणी सुरू असताना वरिष्ठ वकील अॅड. दुष्यंत दवे आणि अॅड. पल्लव सिसोदिया यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. यावेळी दुष्यंत दवे यांचा आवाज प्रचंड चढला होता. यावेळी खंडपीठातील न्यायमूर्तींनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता दवे यांनी त्यांनाही जुमानले नाही. त्यामुळे खंडपीठातील न्यायमूर्तींनी दोन्ही वकिलांची चांगलीच कानउघडणी केली . तुम्ही सर्वोच्च न्यायालयाला मासळी बाजाराच्या पातळीला आणून ठेवू नका. हे कदापि खपवून घेतले जाणार नाही. न्यायमूर्ती काही बोलत असतील त्यांना शांत बसवून तुम्ही स्वत:चे बोलणे पुढे रेटू शकत नाही. तुम्ही आमचे ऐकलेच पाहिजे. तुम्हाला संधी दिली जाईल, तेव्हा तुम्ही आपली बाजू मांडावी, असे न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांनी अॅड. दुष्यंत दवे यांना सुनावले. त्यावरही दवे यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. नाही, मी तसे करणार नाही. परंतु, तुम्ही अॅड. पल्लव सिसोदिया (याचिककर्त्यांचे वकील) आणि हरिष साळवे (महाराष्ट्र सरकारची बाजू मांडणारे वकील) यांना खटला लढवण्यापासून रोखले पाहिजे. तुमच्या सदसदविवेकबुद्धीला स्मरून तुम्ही याचा निर्णय घेतला पाहिजे, असे अॅड. दवे यांनी म्हटले. तेव्हा खंडपीठातील दुसरे न्यायमूर्ती ए.एम. खानविलकरही प्रचंड संतापले. तुम्ही आम्हाला सदसदविवेकबुद्धी म्हणजे काय ते शिकवण्याची गरज नाही. असे न्या. खानविलकर यांनी म्हटले.
तर दुसरीकडे अॅड.पल्लव सिसोदिया यांचीही न्यायालयाने हजेरी घेतली. अॅड.पल्लव सिसोदिया यांनी म्हटले होते की, सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायमूर्तींनी घेतलेल्या पत्रकार परिषदेने या प्रकरणाच्या सुनावणीविषयी आक्षेप घेण्याची संधी दिली. या प्रकरणाची एकतर्फी चौकशी होऊ शकत नाही, की ज्यात आरोप करणारी व्यक्ती या न्यायालयाच्या प्रतिष्ठेला आणि आस्थेला धक्का लावतील आणि तरीही सहज सुटतील. सिसोदिया यांचे हे वक्तव्य ऐकून अॅड. दवे आणि अॅड. इंदिरा जयसिंह आक्रमक झाल्या. जर तुमच्या अशिलाला याप्रकरणाची चौकशीच हवी नव्हती तर त्यांनी याचिकाच दाखल का केली, असा सवाल त्यांनी विचारला. यापूर्वी तुम्ही अमित शहांचे वकील होतात आणि आता याचिककर्त्यांची बाजू मांडत आहात, असे अॅड. दवे यांनी म्हटले. त्यावर सिसोदिया प्रचंड संतापले. तुम्ही काय बोलत आहात याच्याशी आम्हाला काही देणेघेणे नाही. तुम्ही स्वर्गात वा नरकात, वाट्टेल तिथे जा, असे त्यांनी सहकारी वकिलांना उद्देशून म्हटले. सिसोदिया यांच्या या वाक्यावर न्यायालयाने आक्षेप घेतला. या एकूणच शाब्दिक देवाणघेवाणीमुळे सुप्रीम कोर्टातील वातावरण प्रचंड तापले होते.