२२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार असून या सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान, या सोहळ्याबाबत समाजमाध्यमावर चुकीची माहिती शेअर करण्यात येत आहे. यावर आता केंद्र सरकारने एक नोटीस प्रसिद्ध केली आहे. मीडिया आऊटलेट्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला राम मंदिर कार्यक्रमाशी संबंधित खोट्या आणि फेरफार बातम्या प्रकाशित न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राम मंदिरात लोखंड, स्टीलचा वापर केलेला नाही, इस्त्रोनेही बांधकामात मदत केली
ही नोटीस माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने प्रसिद्ध केली आहे. या नोटीसमध्ये दिलेल्या माहितीनुसार, "काही खोटे, प्रक्षोभक आणि बनावट संदेश पसरवले जात असल्याचे निदर्शनास आले आहे, विशेषत: सोशल मीडियावर, यामुळे जातीय सलोखा आणि सार्वजनिक सुव्यवस्था बिघडू शकते." अयोध्येतील राम ललाच्या अभिषेक सोहळा २२ जानेवारी रोजी होणार आहे, यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर अनेकजण उपस्थित राहणार आहेत.
प्रभू रामललाच्या अभिषेकाने राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. राम मंदिर सोहळ्यापूर्वी व्हीआयपी तिकिटे, राम मंदिराचा प्रसाद देण्याचा दावा करणाऱ्या अनेक बनावट लिंक्स सोशल मीडियावर दिसत आहेत.
शुक्रवारी १९ जानेवारी रोजी ई-कॉमर्स साइट अॅमेझॉनला केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने अयोध्या राम मंदिर प्रसादची जाहीरात काढून टाकण्यासाठी नोटीस दिली होती. यावर Amazon ने सांगितले की, ते त्यांच्या धोरणांनुसार अशावर योग्य कारवाई करत आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, अॅमेझॉनने कबूल केले की काही विक्रेत्यांच्या दिशाभूल करणाऱ्या उत्पादनांच्या दाव्यांबाबत त्यांना CCPA कडून नोटीस मिळाली आहे आणि कंपनी त्यांची चौकशी करत असल्याचे सांगितले.
काही दिवसांपूर्वी, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी व्हिआयपी तिकिट देण्याच सांगण्यात आले होते. याबाबत बनावट QR कोड असलेला एक व्हॉट्सअॅप मेसेज व्हायरल झाला होता. यानंतर मंदिर प्रशासनाने सांगितले की आम्ही स्वत: काही निवडक पाहुण्यांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रण पाठवले आहे.