लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : वकिलांच्या चेंबरसाठी जागा देण्याच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे (एससीबीए) अध्यक्ष विकास सिंह व सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यात गुरुवारी खडाजंगी झाली. विकास सिंह यांनी न्यायालयात आवाज चढवून बोलू व धमकावू नये, माझ्या न्यायालयातून चालते व्हावे, अशा शब्दांत त्यांना सरन्यायाधीशांनी खडसावले.
वकिलांच्या चेंबरसाठी जमीन मिळण्याकरिता सादर केलेली याचिका सुनावणीसाठी सूचिबद्ध होण्यासाठी गेले सहा महिने मी प्रयत्न करत आहे. मात्र त्याला यश आलेले नाही, असे विकास सिंह यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाला सांगितले. अप्पूघरची जमीन एससीबीएने केलेल्या याचिकेमुळे सर्वोच्च न्यायालयाला मिळाली. त्यातील एक छोटी जागा अनिच्छेने एससीबीएला देण्यात आली. त्यावर सरन्यायाधीश चंद्रचूड विकास सिंह यांना म्हणाले की, कोणतीही जमीन तुम्ही अशा प्रकारे मागू शकत नाहीत. खंडपीठ एकही दिवस रिकामे बसलेले नाही हे तुम्ही पाहातच आहात.
तुमच्यामुळे खंडपीठ घाबरणार नाही...विकास सिंह म्हणाले की, जर सुनावणीसाठी तारीख मिळत नसेल तर मला हे प्रकरण घेऊन तुमच्या घरी यावे लागेल. यावर सरन्यायाधीश संतप्त झाले. त्यांनी विकास सिंह यांना खडसावताना म्हटले की, तुम्ही कोर्टाला या पद्धतीने धमकावू शकत नाही. आवाज चढवून बोलू नका. ही वागायची पद्धत आहे का? तुमच्या भूमिकेमुळे खंडपीठ घाबरणार नाही.