नवी दिल्ली:काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वादात सापडल्या आहेत. चित्रकूट येथील मंदाकिनी नदीच्या काठावरील रामघाटावर त्यांनी बुधवारी महिलांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी 'उठो द्रौपदी शस्त्र संभालो' या कवितेतील ओळी वाचल्या, मात्र ही कविता लिहिणारे कवी पुष्यमित्र उपाध्याय यांनी त्यावर आक्षेप घेतला आणि प्रियांकावर कविता चोरल्याचा आरोप केला.
कविता चोरणाऱ्यांकडून देशाला काय अपेक्षा असणार?
पुष्यमित्र यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू यांची पोस्टही रिट्विट केली आहे, ज्यामध्ये त्यांनी प्रियंका गांधींचा व्हिडिओ शेअर केला आहे. पुष्मित्राने लिहिले की, 'प्रियंकाजी, मी ही कविता तुमच्या खराब राजकारणासाठी नाही तर देशातील महिलांसाठी लिहिली आहे. मी तुमच्या विचारसरणीचे समर्थन करत नाही. मी माझ्या साहित्याचा राजकीय वापर करू देणार नाही. कविता चोरणाऱ्यांकडून देश काय अपेक्षा करणार? 2012 च्या निर्भया प्रकरणावर लिहिलेल्या कवितेचा संदेश तुमच्या राजकारणापेक्षा खूप वेगळा आणि व्यापक आहे. राजकीय पक्षांना विनंती आहे की, राजकीय फायद्यासाठी कवितेचा सार खराब करू नये.'
काय म्हणाल्या होत्या प्रियंका गांधी ?
बुधवारी प्रियकांनी चित्रकूट येथील मत्स्यगजेंद्रनाथ मंदिरात प्रार्थना करुन मंदाकिनी नदीच्या रामघाटावर महिलांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, 'राजकारणात आजकाल खूप क्रूरता आणि हिंसाचार पसरला आहे. लखीमपूरमध्ये मंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडले, सरकारने त्याला मदत केली. आपल्या मागण्या मांडण्यासाठी गेलेल्या आशा भगिनींना प्रशासनाकडून बेदम मारहाण करण्यात आली. तुमचे शोषण होत असेल आणि तुमच्यावर अत्याचार होत असतील, तर तुम्हाला मारहाण करणाऱ्यांकडून तुमचा अधिकार कधीच मिळणार नाही. आपल्या हक्कासाठी लढावे लागेल. जे सरकार तुमच्यासाठी काहीच करत नाही, मग ते पुढे कशाला चालवायचे ? असा सवाल करत प्रियंकांनी कवी पुष्यमित्र यांच्या कवितेची ओळी म्हटल्या.