रांची: देशात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या राष्ट्रवादावरील वादावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रमुखमोहन भागवत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. झारखंडची राजधानी रांचीमध्ये एका कार्यक्रमात त्यांनी राष्ट्रवाद हा शब्द वापरू नका त्यामध्ये हिटलर आणि नाझीवादाची झलक पहायला मिळते, असे म्हटले आहे. याद्वारे त्यांनी एकप्रकारे भाजपाच्याच नेत्यांचे कान पिळल्याची चर्चा होत आहे.
मोहन भागवत हे स्पष्टवक्ते म्हणून ओळखले जातात. बऱ्याचदा त्यांनी भाषणांमधून भाजपाच्या भूमिकांविरोधात मते मांडलेली आहेत. गेल्या काही काळापासून देशात राष्ट्रवादावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीका होत होती. यावर भागवत यांनी मत मांडले आहे. आरएसएसचा विस्तार देशासाठी आहे कारण आमचे लक्ष्य भारताला विश्वगुरु बनविण्याचे आहे, असे ते म्हणाले.
याचबरोबर भागवत यांनी सांगितले की, राष्ट्रवादासारख्या शब्दाचा वापर करू नये. कारण याचा अर्थ नाझी किंवा हिटलरशी संबंधित काढले जाऊ शकते. अशावेळी देश, राष्ट्रीय अशा शब्दांचाच प्रामुख्याने वापर करावा. जगासमोर सध्या आयएसआयएस, कट्टरपंथी आणि जलवायू परिवर्तन यासारख्या समस्या आहेत.
विकसित देश त्यांचा व्यापार प्रत्येक देशामध्ये वाढविण्याचे काम करतात. या द्वारे ते त्यांच्या अटी मान्य करायला भाग पाडतात. जगासमोर ज्या समस्या आहेत त्यांच्यापासून भारतच दिलासा देऊ शकतो. अशात हिंदुस्थानला जगाचे नेतृत्व करण्याचा विचार करायला हवा. देशाची एकताच आपली मोठी ताकद आहे, असेही भागवत म्हणाले.