'माझ्याकडून चूक झाली, मोदींवर रागावू नका...'; केंद्रीय मंत्र्याने भरसभेत मागितली लोकांची माफी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2024 04:15 PM2024-04-28T16:15:23+5:302024-04-28T16:17:48+5:30
BJP Parshottam Rupala : 'माझ्याकडून चूक झाली, तुमचा राग पंतप्रधान मोदींवर काढू नका,' असं म्हणत भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांने क्षत्रिय समाजाची माफी मागितली.
Parshottam Rupala Controversy: गुजरातमध्ये लोकसभा निवडणुकीचा प्रचार सध्या अंतिम टप्प्यात आला आहे. ७ मे रोजी गुजरामध्ये २६ जागांवर मतदान होणार आहे. एकीकडे सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस यांच्यात संघर्ष पाहायला मिळतोय तर दुसरीकडे क्षत्रिय समाजाचा मुद्दा देखील तापला आहे. अशातच केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी पुन्हा एकदा क्षत्रिय समाजाची माफी मागितली आहे. भरसभेत रुपाला यांनी क्षत्रिय समाजाच्या लोकांकडे माफी मागितली.
गुजरातच्या राजकोट मतदारसंघातून पुरुशोत्तम रुपाला हे भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवत आहेत. महिन्याभरापूर्वी रुपाला यांनी क्षत्रिय समाजाशी संबंधित वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यामुळे क्षत्रिय समाज संतप्त आहे. रुपालांच्या विरोधात क्षत्रिय समाजाने अनेक आंदोलने सुरु केली आहेत. रुपाला यांना पराभूत करण्यासाठी क्षत्रिय समाजाने धर्मरथ काढला आहे. तसेच क्षत्रिय समाज भाजपच्या विरोधात मतदान करण्यावर ठाम आहे. या सगळ्यात आता पुन्हा परशोत्तम रुपाला यांनी क्षत्रिय समाजाची माफी मागितली आहे. माझ्या चुकीची शिक्षा पंतप्रधान मोदी यांना देऊ नका असे रुपाला यांनी म्हटलं आहे.
शनिवारी जसदण येथील निवडणूक सभेत रुपाला बोलत होते. 'माझ्याकडून चूक झाली होती. मी जाहीर माफीही मागितली आहे. 'माझा हेतू चुकीचा नव्हता. मी क्षत्रिय समाजाचीही माफी मागितली आहे. त्यांच्याकडूनही मला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. पण मग पंतप्रधान मोदींना विरोध का?,' असा सवाल पुरुषोत्तम रुपाला यांनी विचारला.
"भाजपच्या जडणघडणीत तुमचाही मोठा वाटा आहे. पंतप्रधान मोदी दिवसाचे 18 तास काम करतात आणि देशाचा विचार करत नाहीत. अनेक क्षत्रिय पंतप्रधान मोदींच्या विकास प्रवासात त्यांच्यासोबत आहेत. मग माझ्यामुळे त्यांचा विरोध का? मी माझी चूक मान्य करतो. पण क्षत्रिय समाजाला पंतप्रधान मोदींच्या विरोधात उभे करणे मला योग्य वाटत नाही. कृपया पंतप्रधानांविरोधात दाखवल्या जात असलेल्या संतापाचा पुन्हा विचार करा," असेही रुपाला म्हणाले.
नेमका वाद कशामुळे?
पुरुशोत्तम रुपाला हे पाटीदार समाजातील आहेत. ब्रिटीश राजवटीत माजी क्षत्रिय राज्यकर्त्यांविरुद्ध त्यांनी केलेल्या कथित टिप्पणीनंतर समाज त्यांच्या विरोधात उभा राहिला आहे. 23 मार्च रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये रुपाला राजकोटमध्ये एका कार्यक्रमात बोलताना दिसत होते. 'ब्रिटिशांनी आमच्यावर राज्य केले... त्यांनी आमचा छळ करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. त्यावेळी राजे इंग्रजांपुढे नतमस्तक झाले. त्यांनी इंग्रजांशी कौटुंबिक संबंध प्रस्थापित केले होते. त्यांनी आपल्या मुलींचे लग्नही त्यांच्याशी केले. पण आपल्या रुखी समाजाने ना आपला धर्म बदलला ना इंग्रजांशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले, तरीही त्यांच्यावर सर्वाधिक अत्याचार झाले, असे रुपाला यांनी म्हटलं. याच वक्तव्यावरुन क्षत्रिय समाज रुपाला यांच्याविरोधात संताप व्यक्त करत आहे.