जितेंद्र प्रधान
हाथरस : हाथरस येथील चेंगराचेंगरी प्रकरणात प्रशासनाच्या अनेक चुका झाल्या आहेत, असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. मात्र या मुद्द्यावर मला राजकारण करायचे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. हाथरस दुर्घटनेतील पीडितांना जास्तीत जास्त आर्थिक मदत द्यावी, असे आवाहन त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना केले.
चेंगराचेंगरीमध्ये मरण पावलेल्यांच्या नातेवाइकांची राहुल गांधी यांनी हाथरस व अलिगढ येथे शुक्रवारी भेट घेतली व त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यानंतर गांधी यांनी पत्रकारांना सांगितले की, एखाद्या दुर्घटनेत इतकी मोठी जीवितहानी होणे तसेच त्यांच्या कुटुंबीयांना हे आघात सहन करावे लागले, ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. प्रशासनाने काही चुका केल्या हे सदर दुर्घटनेकडे पाहिल्यानंतर लक्षात येते. प्रशासनाच्या काय चुका झाल्या ते उत्तर प्रदेश सरकारने शोधले पाहिजे. धार्मिक गुरू भोलेबाबाच्या सत्संगात २ जुलै रोजी चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाला आहे.
आरोपीच्या घरी राहायचा भोलेबाबा
हाथरसमध्ये ज्या भोलेबाबाच्या सत्संगात चेंगराचेंगरी होऊन मोठी दुर्घटना घडली, त्याचा भक्त हा राजस्थानातील प्रश्नपत्रिका फोडण्याच्या प्रकरणातील आरोपी आहे. भोलेबाबा राजस्थानला आला की, या आरोपीच्या घरीच राहात असे. दौसामध्ये जिथे भोलेबाबाचा आश्रम होता ती जागा पोलिसांनी जप्त केली आहे.
बाबा नारायण हरि साकार ऊर्फ सूरजपाल ऊर्फ भोलेबाबा याचा राजस्थानातील दौसा येथील आग्रा रोडवर गोविंद देवजी मंदिराच्या समोर आश्रम आहे. ही वास्तू पटवारी हर्षवर्धन मीणा याच्या मालकीची आहे. हर्षवर्धन २०२० साली झालेल्या जेईएन भरती परीक्षेतील प्रश्नपत्रिका फोडल्याच्या प्रकरणातील आरोपी आहे. यंदाच्या वर्षी जानेवारीमध्ये पोलिसांनी या आश्रमावर धाड टाकली. ही मालमत्ता जप्त करण्यात आली. त्यानंतर भोलेबाबा या ठिकाणी कधीही आला नाही.
पूर्वी भोलेबाबाचा सत्संग होत असलेल्या आश्रमाच्या इमारतीवर एक फलक आहे. त्यावर लिहिले आहे की, भोलेबाबा सध्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हवापालटासाठी काही ठिकाणी गेले आहेत. त्यामुळे सत्संगाचे आयोजन करण्यात आलेले नाही. आश्रमाच्या वास्तूचा मालक हर्षवर्धन हा परीक्षा गैरप्रकारांतील आरोपी असल्याने याची तपास यंत्रणांची दखल घेतली आहे.
अश्रूंना करून दिली वाट...तुम्ही काळजी करू नका, तुम्ही आमच्या कुटुंबाचे सदस्य आहात, असे राहुल गांधी यांनी मृतांच्या नातेवाइकांना सांगितले. राहुल गांधी यांना पाहताच पीडित कुटुंबीयांपैकी काही जण त्यांना बिलगले व अश्रूंना मोकळी वाट करून दिली.