नवी दिल्ली - टुलकिटवरून आता पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहे. काँग्रेसचे टूलकिट खलिस्तान्यांच्या टूलकिटपेक्षा खतरनाक असल्याची टीका भाजपाकडून करण्यात आली आहे. एकीकडे कोरोनाचे संकट देशावर अद्यापही कायम असताना, दुसरीकडे भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर आरोप केले आहेत. संकटातही काँग्रेस राजकारण करत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी काँग्रेसने एक टूलकिट तयार केले असल्याचे संबित पात्रा म्हणाले. यानंतर आता काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी (Congress Priyanka Gandhi) यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
प्रियंका गांधी यांनी खोटी माहिती पसरवू नका असं म्हणत जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. प्रियंका यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "खोटी माहिती पसरवण्यात वेळ घालवू नका. जागे व्हा आणि लोकांचे जीव वाचवायला सुरुवात करा" असं ट्विट केलं आहे. तसेच हे टूलकिट फेक असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. टूलकिटचा फोटो त्यांनी शेअर केला आहे. त्यावर फेक असा उल्लेख करण्यात आला आहे. काँग्रेसचे टूलकिट खलिस्तान्यांच्या टूलकिटपेक्षा कमी खतरनाक नाही. ‘इंडियन व्हायरस, मोदी व्हायरस, असे शब्द सोशल मीडियातून व्हायरल करा’, असे आदेश काँग्रेस कार्यकर्त्यांना दिले आहेत. सत्तेसाठी काँग्रेस देशद्रोह्यांना पुढे करू शकते वेळ आल्यास देशद्रोहही करू शकते, असा दावा अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे.
"लसीकरण उत्सव साजरा केला पण लसीची व्यवस्थाच नाही"; प्रियंका गांधी मोदी सरकारवर संतापल्या
प्रियंका गांधी (Congress Priyanka Gandhi) यांनी याआधीही मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. कोरोना लसीकरणावरून निशाणा साधला होता. "लसीकरण उत्सव साजरा केला पण लसीची व्यवस्थाच नाही" असं म्हणत मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केले होते. "भारत सर्वात मोठा लस उत्पादक देश आहे. भाजपा सरकारने 12 एप्रिल रोजी लसीकरण 'उत्सव' साजरा केला. परंतु, कोरोना लसीची कोणतीच व्यवस्था केली नाही आणि या 30 दिवसांत आमच्या देशातील लसीकरण 82 टक्क्यांनी कमी झाले" असं प्रियांका यांनी ट्विट करून म्हटलं होतं.
मोदी सरकारने पंतप्रधानांच्या नवीन घरासाठी 13 हजार कोटी खर्च करण्यापेक्षा कोरोना रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी खर्च केले तर बरे होईल असं म्हणत जोरदार टीका केली होती. तसेच "देशातील लोक जेव्हा ऑक्सिजन, लस, रुग्णालयातील बेड, औषधे मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, अशावेळी सरकारने पंतप्रधानांच्या नवीन घरासाठी 13 हजार कोटी खर्च करण्यापेक्षा रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी खर्च केले तर बरे होईल. अशा प्रकारच्या खर्चांमुळे अशा प्रकारच्या खर्चामुळे सरकारची प्राथमिकता ही अन्य गोष्टींसाठी आहे असा संदेश लोकांमध्ये जातो" असं प्रियंका यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.