लखनौ : उत्तर प्रदेशच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कार्यालयांमध्ये नवीन ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाश्चिमात्य पोशाखांऐवजी फॉर्मल ड्रेसमध्ये कार्यालयात येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.एनएचएमचे अतिरिक्त अभियान संचालक डॉ. हिरालाल यांच्या वतीने हा आदेश जारी करण्यात आला आहे.
या आदेशानुसार कर्मचाऱ्यांच्या फॅशनेबल कपड्यांवर बंदी घालण्यात आली आहे. एनएचएमच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड निश्चित करण्यात आला आहे. महिलांनी जीन्स-टी-शर्ट किंवा स्कर्ट-टॉप घालून कार्यालयात येऊ नये. त्यांनी केवळ साडी किंवा दुपट्टा, सलवार-कमीज घालून कार्यालयात यावे. पुरुष कर्मचाऱ्यांना जीन्स-टी-शर्टऐवजी फॉर्मल पॅंट-शर्ट घालून कार्यालयात यावे लागणार आहे.
यापूर्वीही आदेश...एनएचएमच्या संचालक पिंकी जॉवेल यांनीदेखील ड्रेस कोडचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याआधी वैद्यकीय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कार्यरत पुरुष, महिला डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या ड्रेस कोडचे पालन करण्याचे आदेश जारी केले होते.