हैदराबाद - हेलिकॉप्टरचा दरवाजा थेट घराच्या छतावर येऊन पडल्याची अजब घटना हैदराबादमधील सिकंदराबाद येथे घडली आहे. लालापत भागात जेव्हा हेलिकॉप्टरचा दरवाजा येऊन थेट जवळच्या इमारतीवरील छतावर कोसळला तेव्हा लोकांनाही सुरुवातीला नेमकं काय झालं ते कळलं नव्हतं. हेलिकॉप्टरचा दरवाजा पडल्याचं माहिती मिळाल्यानंतर त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. हे हेलिकॉप्टर तेलंगणा राज्य विमानचालन अकादमीच होतं. 2500 फूटावर हेलिकॉप्टर उडत असताना त्याचा लोखंडी दरवाजा अचानक तुटला आणि छतावर येऊन कोसळला. यावेळी हेलिकॉप्टरच्या कॉकपिटमध्ये दोन पायलट्स होते. या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही.
हेलिकॉप्टरचा दरवाजा एका दोन मजली इमारतीच्या छतावर येऊन पडला. विशेष म्हणजे, ही दुर्घटना होण्याच्या काही वेळ आधीच छतावर काम करणारा एक कामगार काम करत होता. दुर्घटनेच्या काही मिनिटं आधीच जेवण्यासाठी तो खाली गेला होता. नागरी विमान वाहतुकीच्या संचालकांनी याप्रकरणी चौकशीचा आदेश दिला आहे.
या इमारतीत स्थानिक काँग्रेस कार्यकर्ता गणेश यादव राहतात. घटना घडली तेव्हा ते इमारतीत उपस्थित होते. त्यांनी सांगितलं की, 'जेव्हा छतावर काहीतरी कोसळलं, तेव्हा प्रचंड मोठा आवाज झाला. आवाजामुळे परिसरातील सर्वच लोकांना छताच्या दिशेने धाव घेतली. तिथे मला जवळपास तीन फूट दरवाजा पाण्याच्या टाकीजवळ पडलेला दिसला. यावेळी काही काचेचे तुकडेही तिथे पडले होते'.
गणेश यादव यांच्या शेजा-यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'दरवाजा कोसळण्याआधी एक हेलिकॉप्टर धोकादायक रितीने इमारतीच्या आसपास उडत होतं'. स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. छतावर कोसळलेला दरवाजा लालागुडा पोलिसांनी जप्त केला आहे.