नवी दिल्ली, दि. 5- डोकलाम मुद्यावरून चीनने पुन्हा एकदा भारताला युद्धाची धमकी दिली आहे. सीमेवर तैनात असलेल्या जवानांना तेथून हटविण्यासाठी चीन एका छोटं सैन्य ऑपरेशन करण्याच्या विचारात आहे. चीनमधील एका सरकारी वृत्तपत्रात तज्ज्ञांचा हवाला देऊन हा दावा करण्यात आला आहे. डोकलाममध्ये चीनकडून रस्त्या बनविण्याच्या झालेल्या प्रयत्नानंतर 16 जूनपासून भारतीय जवान सीमेवर तैनात आहेत. चीनची पीपुल्स लिबरेशन आर्मी दोन आठवड्यांच्या आत डोकलाममध्ये भारतीय लष्करावर कारवाई करू शकते, असं मत चीनच्या संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. मागील २४ तासांत चीनकडून करण्यात आलेल्या वक्तव्यावरून ही परिस्थिती दिसते आहे, चीन भारतीय लष्कराला चीनच्या भूभागात आणखी काही काळानंतर सहन करू शकणार नाही. दोन आठवड्याच्या आत चीनकडून भारताविरोधात लष्करी ऑपरेशन राबवलं जाऊ शकतं, असं शांघाय अॅकेडमी ऑफ सोशल सायन्सेसमधील आंतरराष्ट्रीय विषयांवरचे संशोधक हु जियोंग म्हणाले आहेत.
भारतीय सैनिकांना कैदेत ठेवणं किंवा त्यांना माघार घेण्यास भाग पाडणं, हा चीनच्या कारवाईचा हेतू असेल. त्याचबरोबर चीनच्या विदेश मंत्रालयाकडून या कारवाईपूर्वी भारताला याबाबतची माहिती दिली जाईल, असं ग्लोबल टाइम्सने हु जियोंग यांच्या हवाल्याने म्हटलं आहे.गेल्या २४ तासांत चीनच्या विदेश मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, भारतातील चीनचा दुतावास आणि पीपुल्स डेलीकडून सातत्याने भारताला धमकी दिली जात आहे. भारताला डोकलाममधील आपलं सैन्य हटवण्यास चीनकडून सांगितलं जात आहे. मागील दोन महिन्यांपासून भारत-चीनचे सैन्य डोकलाममध्ये आमने-सामने उभे आहेत. चीनच्या सरकारी वाहिनीने शुक्रवारी चीनच्या सैन्याने तिबेट येथे युद्धाभ्यास केल्याचं वृत्त दिलं. पहाटे ४ वाजता हा युद्धाभ्यास सुरू झाला होता. यामध्ये शत्रूपक्षाच्या ठिकाणांवर कब्जा करण्याचा सराव करण्यात आला होता.
डोकलाममध्ये चीन लष्कर आयुधे वापरू शकतो, हे चिनी सैन्याच्या युद्धाभ्यासावरून स्पष्ट होतं. कारण भारताची उक्ती आणि कृतीमध्ये खूप फरक आहे, असं सेंटर फॉर एशिया-पॅसिफिक स्टडी सेंटरचे संचालक जाओ गेनचेंग म्हणाले आहेत. भारताच्या विदेश मंत्री सुषमा स्वराज यांनी गुरूवारी संसदेत युद्धामुळे समस्येचे निवारण होऊ शकत नसल्याचं म्हटले होते. यासाठी चर्चेची आवश्यकता असल्याचं त्या म्हणाल्या होत्या. त्याचबरोबर भारत कोणतीही परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.