Kashmir Terror Attack : जम्मू काश्मिरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी डोकं वर काढलं आहे. जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी संध्याकाळी एकापाठोपाठ दोन दहशतवादी हल्ले झाले. लोकसभा निवडणुकीच्या अवघ्या दोन दिवस आधी दक्षिण काश्मीरच्या बारामुल्लामध्ये दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला. शोपियानच्या हिरपोरा भागात झालेल्या या हल्ल्यात दहशतवाद्यांनी भाजपचे माजी सरपंच एजाज अहमद यांची गोळ्या झाडून हत्या केली. तर दुसऱ्या हल्ल्यात जयपूरहून फिरायला आलेल्या जोडप्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. दोघांनाही गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
भाजप नेते आणि माजी सरपंच एजाज अहमद यांची शोपियानमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. भाजपच्या काश्मीर मीडिया विभागाचे प्रभारी साजिद युसूफ शाह यांनी अहमद यांच्या हत्येचा निषेध व्यक्त केला एजाज हे जम्मू-काश्मीरमधील भाजपचा शूर सैनिक होते. या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या एजाज अहमद यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भाजप खंबीरपणे उभी आहे," असे शाह यांनी म्हटलं.
दुसरीकडे अनंतनागच्या हीरपोरामध्ये, जयपूरवरुन आलेल्या एका जोडप्याला गोळ्या घालून जखमी करण्यात आले. दहशतवाद्यांनी जयपूर येथील पर्यटक पती-पत्नी तबरेज आणि फरहा यांना गोळ्या घालून जखमी केले. हे दोघेही पहलगाम येथील पर्यटनस्थळी तंबूत थांबले होते. तंबूतून बाहेर येताच दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात तबरेजची प्रकृती चिंताजनक आहे, तर फरहाची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.
काश्मीर झोन पोलिसांनी सोशल मीडियावरुन याबाबत माहिती दिली.'दहशतवाद्यांनी अनंतनागच्या यन्नारमध्ये गोळीबार करत जयपूरची एक महिला आणि तिचा पती तबरेज यांना जखमी केले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे,' अशी माहिती काश्मीर पोलिसांनी दिली.
या हल्ल्यानंतर अर्ध्या तासाने दहशतवाद्यांनी शोपियांच्या हिरपोरामध्ये रात्री साडेदहाच्या सुमारास माजी सरपंच एजाज शेख यांची गोळ्या झाडून हत्या केली. अनंतनाग आणि शोपियान परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून हल्लेखोरांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.