नवी दिल्ली : सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांना पाकिस्तान सीमेपलीकडून घुसखोरी करणाऱ्या ड्रोनचा २०२२ मध्ये जवळपास दुप्पट संख्येने सामना करावा लागला. पाकने अंमलीपदार्थ, शस्त्रे आणि दारूगोळा भारतीय हद्दीत देशविघातक शक्तींना पोहोचविण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती दलाचे महासंचालक पंकज कुमार सिंह यांनी दिली.
बीएसएफने अलीकडेच ड्रोन फॉरेन्सिकचा अभ्यास करण्यासाठी दिल्लीतील एका शिबिरात एक अत्याधुनिक प्रयोगशाळा स्थापन केली आणि त्याचे परिणाम खूप उत्साहवर्धक आहेत. या प्रयोगशाळेसाठी सुमारे ५० लाख रुपये खर्च करण्यात आला. यासाठी संरक्षण क्षेत्रातील जाणकारांची मदत घेतली आहे. तंत्रज्ञान-जाणकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांंचे मनुष्यबळ तेथे तैनात आहे. सुरक्षा यंत्रणा गेल्या काही वर्षांपासून या सीमापार बेकायदेशीर कृतीत सामील असलेल्या गुन्हेगारांचा उड्डाण मार्ग आणि पत्तादेखील शोधू शकतात, असे पंकजकुमार यांनी सांगितले.
घातपातासाठी वापर- ‘बीएसएफला गेल्या काही काळापासून ड्रोनच्या धोक्याचा सामना करावा लागला आहे. - ड्रोनच्या वैशिष्ट्यांचा शत्रूकडून वाईट कामांसाठी वापर होत आहे, त्यासाठी वेगवेगळ्या पद्धती शोधल्या जात आहेत, ड्रोनमुळे सीमा ओलांडून घातक गोष्टी पाठविणे सोपे झाले. - त्यामळे ड्रोनचे एक नवे आव्हान उभे राहिले आहे,’ अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.
कशी होते घुसखोरी? बीएसएफने २०२० मध्ये भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर सुमारे ७९ ड्रोन उड्डाणे शोधून काढली, ती गेल्यावर्षी १०९ पर्यंत वाढली आणि या वर्षी २६६ एवढी झाली आहे. यावर्षी पंजाबमध्ये २१५ ड्रोनने घुसखोरी केली, तर जम्मूमध्ये २२.