देशातील ४ राज्याच्या निवडणूक निकालानंतर भाजपने देशभर जल्लोष केला आहे. कारण, चारपैकी तीन राज्यात भाजपने जोरदार मुसंडी मारली. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या तीन राज्यात भाजपने मोठी कामगिरी केली. राजस्थान आणि छत्तीगड या राज्यात सत्तांतर होऊन भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे, अनेकांना हा निकाल आश्चर्यकारक वाटतो. शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनीही या विजयावर प्रतिक्रिया देताना लोकांना आश्चर्य वाटत असल्याच म्हटलं आहे. तसेच, जनादेशाचा आपण स्वीकार करतो, पण लोकांच्या मनात शंका आहे, ती दूर केली पाहिजे, असेही राऊत यांनी म्हटले.
विधानसभा निवडणुकांच्या निकालादरम्यान, रविवारी संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली होती. पत्रकार परिषदेत खासदार राऊत यांनी काँग्रेसच्या पराभवामागचे कारण आणि काँग्रेसला सल्लाही दिला होता. राऊत म्हणाले की, यापुढे काँग्रेस पक्षाला इंडिया आघाडी मजबूत करण्यासाठी त्यांच्या पक्षात आणि इंडिया आघाडीतील समन्वयाच्याबाबतीत देशभरात नव्याने विचार करण्याची गरज आली आहे. काहीही झालं तरीही इंडिया आघाडी मजबूत राहिलं, मध्य प्रदेशमध्ये इंडिया आघाडी म्हणून निवडणूक लढली असती, आपल्या काही सहकाऱ्यांना जर काँग्रेसने मदत केली असती तर आज काँग्रेसची कामगिरी आजपेक्षा चांगली राहिली असती, असं माझ स्पष्ट मत आहे, असं राऊत यांनी म्हटलं होतं. त्यानंतर, आज दिल्लीत असताना राऊत यांनी वेगळीच मागणी केली आहे.
जनादेशाचा आम्ही स्वीकार करतो, पण लोकांच्या मनात शंका आहे. विशेष म्हणजे मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील निकालानंतर आमच्या, लोकांच्या मनात शंक उपस्थित होत आहे. त्यामुळे, एक निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा आणि लोकांच्या मनाती शंका दूर करा, असे संजय राऊत यांनी म्हटले. लोकसभा किंवा विधानसभा एक निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या, म्हणजे लोकांना बोलण्याची संधी राहणार नाही. आता, मुंबई महापालिका आणि मुंबईसह १४ महापालिकांच्या निवडणुका घ्यायची हिंमत दाखवा, आम्ही तयार आहोत, असे आव्हानही राऊत यांनी भाजपला दिले आहे.
विजयानंतर उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
चार राज्यांचे निकाल लागले जे जिंकले त्यांचे अभिनंदन करतो. अगदी मोकळ्या मनाने करतो. निकाल अपेक्षित अनपेक्षित, हे ज्याचं ते बघतील. पण जे-जे जिंकले त्या सर्वांचं अभिनंदन. यालाच लोकशाही म्हणतात. अशीच लोकशाही देशात टिकायला हवी आणि ती टिकावी यासाठीच आपण लढत आहोत. 2024 ची निवडणूक यासाठी महत्वाची आहे की, आता जशा निवडणुका होत आहेत. तशाच त्या 2024 नंतरही होत राव्यात. हे जनतेने ठरवावे. पूर्वी एक म्हण होती यथा राजा तथा प्रजा, तशीच लोकशाहीत यथा प्रजा तथा राजा. प्रजा ठरवते राजा कोण असावा. पण ते ठरवण्याचा अधिकार राहातो की जातो? असं जेव्हा वाटायला लागलं तेव्हा आपण लढायला उभे राहिलो आहोत, असे शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. दिनानाथ सभागृह, विलेपार्ले येथील नवनियुक्त शिवसेना नेत्यांच्या सन्मान सोहळ्यात ते शिवसैनिकांशी बोलत होते.