कोझिकोड (केरळ) : धावत्या रेल्वेत एकाने अंगावर पेट्रोल टाकून सहप्रवाशांना पेटवून दिल्याची भयंकर घटना रविवारी रात्री केरळच्या कोझिकोड जिल्ह्यात घडली. यात एका बालकासह तिघांचा मृत्यू झाला असून, नऊजण जखमी झाले आहेत. एलत्तूर रेल्वे स्टेशनजवळील रुळावर एक वर्षाचा बालक आणि एका महिलेसह तिघांचे मृतदेह रविवारी रात्री उशिरा आढळून आले. मात्र, त्यांच्या शरीरावर भाजल्याच्या कोणत्याही खुणा नव्हत्या. त्यामुळे आग पाहिल्यानंतर त्यांनी रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न केला असावा, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.
आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याची अद्याप ओळख पटू शकलेली नाही. आरोपी व अन्य प्रवासी यांच्या भांडणातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज होता. मात्र, एका प्रवाशाने असे कोणतेही भांडण झाले नसल्याचे सांगितले. अलप्पुझा-कन्नूर एक्झिक्युटिव्ह एक्स्प्रेस रात्री ११ च्या सुमारास कोझिकोड शहर ओलांडून कोरापुझा रेल्वेपुलावर आली तेव्हा अज्ञात व्यक्तीने सहप्रवाशांवर पेट्रोल ओतून त्यांना पेटविले. (वृत्तसंस्था)
चौकशीसाठी एसआयटी
पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीला पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. घटनेच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे, असे केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी सोमवारी सांगितले. पोलिसांना या घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचे स्केच जारी केले आहे.
साखळी खेचूून थांबविली ट्रेन...
किरकोळ भाजलेल्या त्यानंतर आरोपी पळून गेला. प्रवाशांनी आपत्कालीन साखळी ओढून रेल्वे थांबवली व जखमींना रुग्णालयात हलवले. रेल्वे कन्नूरला पोहोचल्यानंतर प्रवाशांनी एक महिला आणि एक मूल बेपत्ता असल्याची तक्रार केली. शोध सुरू केला असता एलत्तूर रेल्वे स्थानकाजवळील रुळांवर बालकासह तिघांचे मृतदेह आढळले. या घटनेत नऊजण भाजले. त्यांच्यावर कोझिकोडमध्ये उपचार सुरू आहेत.
रेल्वेत २ महिलांवर बलात्कार, तीन जवानांविरुद्ध गुन्हा, पोलिसांकडून दोन जवानांना अटक
झाशी येथील वीरांगणा लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशनवर लष्कराच्या दोन जवानांनी दोन महिलांवर कथितरीत्या बलात्कार केल्याची घटना घडली. तिसऱ्या जवानाने बलात्कार केला नाही, मात्र तो देखील बलात्काराच्या तयारीत होता, असे पीडित महिलांनी सांगितले. दोन जवानांना अटक करण्यात आली असून, तिसरा फरार आहे. दोन जवान बिहारचे तर तिसरा उत्तराखंडचा आहे.
पीडित महिलांनी सांगितले की, आम्ही नातेवाईकाला भेटण्यासाठी स्टेशनवर आलो होतो. स्टेशनबाहेर एक तरुण उभा होता. कॉल करण्यासाठी मोबाइल मागू लागला. आम्ही मोबाइल दिला. यावेळी त्याने आम्हा दोघींना डब्यात नेले. तेथे दोन तरुण आधीच होते. ते डब्यात दारू पीत होते. तेव्हा कळले की, ते लष्कराचे जवान आहेत. दोघांनी आमच्यावर बलात्कार केला. तिसऱ्या जवानालाही बलात्कार करायचा होता. आम्ही आरडाओरडा करू लागलो. तेव्हा आम्ही लष्कराचे आहोत, तुम्ही काहीही करू शकणार नाही, असे म्हणत त्यांनी आम्हा दोघींना डब्यातून खाली उतरून दिले व आमचा मोबाइल हिसकावून घेतला. यानंतर आम्ही एका तरुणाकडे मोबाइल मागितला व ११२ वर फोन करून पोलिसांना माहिती दिली.