Vaccination Certificate: कोरोना विरोधी लस घेणं जितकं गरजेचं आहे तितकंच लसीकरणाचं प्रमाणपत्र मिळवणं देखील महत्त्वाचं आहे. कारण लसीकरणाचं प्रमाणपत्र तुमच्याकडे नसेल तर तुमची अनेक कामं रखडू शकतात किंवा तुमच्यावर काही निर्बंध देखील येऊ शकतात. हल्ली विमानप्रवास, रेल्वे प्रवासात देखील लसीकरणाचं प्रमाणपत्र मागितलं जातं. तुमच्याकडे कोरोना विरोधी लसीकरणाचं प्रमाणपत्र असेल तर आता अनेक ठिकाणी खास सुविधा देखील दिल्या जात आहेत. लसीकरणाचं सारंकाम आधार कार्डाशीच जोडलं गेलेलं आहे. त्यामुळे आधारकार्डचा वापर करुन प्रमाणपत्र कसं डाऊनलोड करता येईल हे जाणून घेऊयात...
जेव्हा तुमचं कोरोना विरोधी लसीकरणाचा दुसरा डोस पूर्ण होतो तेव्हा तुम्हाला लसीकरण पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र दिलं जातं. यात तुम्ही पहिला आणि दुसरा डोस देखील पूर्ण केलेला असल्याचं नोंद केलेली असते. यात तुमची सर्व माहिती नमूद केलेली असते. तुम्ही पहिला आणि दुसरा डोस केव्हा, कधी आणि कुठे घेतला याची माहिती दिलेली असते.
लसीकरणाचं प्रमाणपत्र तुम्ही आधार क्रमांक किंवा मोबाइल नंबरच्या सहाय्यानं तुम्ही प्राप्त करू शकता. प्रमाणपत्रावर नाव, वय, लिंग, पहिला आणि दुसरा डोस कुठे घेतला, कुणी दिला, कुठे घेतला याची सर्व माहिती नमूद केलेली असते. त्यामुळे कोरोना लसीचे दोन्ही डोस पूर्ण केल्यानंतर न विसरता कोरोना लसीकरणाचं प्रमाणपत्र डाऊनलोड करणं अतिशय गरजेचं आहे.
आधार कार्डचा वापर करुन कसं डाऊनलोड कराल?सरकारी मोबाइल अॅप डिजिलॉकरचा वापर तुम्ही करू शकता. डिजिलॉकर सॉफ्टवेअर तुमच्या सर्व फाइल्स सुरक्षित ठेवण्याचं काम करतं. जसं की आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि इतर महत्त्वाची कागदपत्रं. सरकारी विभागाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या अनेक सूचना देखील या अॅपच्या माध्यमातून मिळतात. डिजिलॉकर सॉफ्टवेअरच्या मदतीनं खाली दिलेल्या पद्धतीनं कोरोना लसीकरणाचं प्रमाणपत्र डाऊनलोड करता येईल.
१. सर्वातआधी Play Store वर जाऊन तुमच्या स्मार्टफोनमध्ये DigiLocker Software डाऊनलोड करुन इन्स्टॉल करा
२. आता तुमचं नाव, जन्मतारीख, लिंग, सुरक्षा पिन, फोन नंबर, आधार क्रमांक आणि इतर माहिती भरुन रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करा.
३. रजिस्ट्रेशन केल्यानंतर केंद्र सरकारच्या टॅबवर क्लिक करा आणि ड्रॉप-डाऊन मेन्यूमधून कुटुंब कल्याण मंत्रालयाचा पर्याय निवडा.
४. आता तुम्हाला 'वॅक्सीन सर्टिफाईड' पर्याय दिसेल
५. कोरोना लसीकरण प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठीच्या लिंकवर क्लिक करा आणि तुमचा १३ अंकी आधारकार्ड क्रमांक नमूद करा. यानंतर तुम्हाला तुमचं कोरोना लसीकरण प्रमाणपत्र प्राप्त होईल.