नवी दिल्ली - भारतकडून सन 2018 आणि 2019 मध्ये जी सॅट 11, जी सॅट-29 आणि जी सॅट 20 उपग्रह लाँच करण्यात येणार आहेत. त्यानंतर देशातील इंटरनेटचा स्पीड 100 जीबीपीएस होईल, असे भारतीय स्पेस संसोधन संस्था म्हणजेच इस्रोचे चेअरमन के. सिवन यांनी म्हटले आहे. हैदराबादमधील एका परिषदेत बोलताना सिवन यांनी याबाबत माहिती दिली.
इंटरनेट वापरकर्त्या देशांमध्ये भारताचा सध्या दुसरा क्रमांक लागतो. मात्र, इंटरनेट स्पीडच्या बाबतीत भारताचा 76 वा क्रमांक आहे. इस्रोकडून 2017 मध्ये जीसॅट हा उपग्रह लाँच करण्यात आला. तर यंदा म्हणजेच 2018 मध्ये जीसॅट-11 आणि जीसॅट-29 हे उपग्रह अंतराळात सोडण्यात आले. आता, लवकरच जीसॅट-20 हा उपग्रह अंतराळात सोडण्यात येणार आहे. या सर्व उपग्रहांच्या प्रक्षेपणामुळे भारतातील इंटरनेटचा स्पीड 100 जीबीपीएस होणार आहे. त्यामुळे देशातील डिजिटल यंत्रणा गतीमान होईल. भारत सरकारकडून यासाठी 10 हजार 900 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यानुसार, 30 पीएसएलव्ही आणि 10 जीएसएलव्ही -एमके 3 या यानांमधून हे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यासाठी आगामी 4 वर्षांचा कालावधी लागणार असून आणखी 50 स्पेसक्राफ्टचे लाँचिंग होणार आहे, असे सिवन यांनी सांगितले.
दरम्यान, इस्रोकडून मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू असून अॅकॅडमिक आणि उद्योजकीय प्रगतीसाठी संस्थेकडून आधुनिक संशोधनावर भर देण्यात येत असल्याचेही सिवन यांनी म्हटले.