लखनऊ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या आधी उत्तर प्रदेशातील नॉयडामध्ये डॉ. आंबेडकर यांच्या एका पुतळ्याची गुरुवारी रात्री विटंबना करण्यात आल्याने तिथे तणाव निर्माण झाला आहे. बदायूंमध्ये याआधी डॉ. आंबेडकरांच्या एका पुतळ्याची मोडतोड करण्यात आली होती.नॉयडातील पुतळ्याची विटंबना झाल्याचे शुक्रवारी उघडकीस आल्याने तिथे तणाव निर्माण झाला. त्यामुळे केवळ नॉयडामध्येच नव्हे, तर संपूर्ण उत्तर प्रदेशात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. डॉ. आंबेडकरांच्या जयंतीच्या आधी हा प्रकार घडल्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारही भांबावून गेले आहे. बाबासाहेबांच्या राज्यातील प्रत्येक पुतळ्यापाशी तसेच संवेदशनशील भागांत पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत.बदायूंमध्ये तीनच दिवसांपूर्वी एका पुतळ्याची मोडतोड केली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने तिथे नवा पुतळा बसवताना डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यातील कोटाला भगवा रंग दिल्याने वाद निर्माण झाला होता. नंतर बसपाच्या कार्यकर्त्यांनी तो रंग बदलला. आता बदायूं जिल्ह्यातील काही पुतळ्यांभोवती जाळीचेकुंपणच बांधण्यात आले आहे. महामानवाला या प्रकारे बंदिस्त ठेवू नका, अशी मागणी दलित संघटनांनी केली आहे. (वृत्तसंस्था)>यंदा जयंती अधिक उत्साहातमुझफ्फरनगरमध्ये डॉ. आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने तणाव निर्माण होईल, ही शक्यता लक्षात घेऊ न तिथे राखीव पोलिसांनाही पाठविण्यात आले आहे. या वर्षी संपूर्ण उत्तर प्रदेशात आंबेडकर जयंती अधिक उत्साहात साजरी होण्याची शक्यता आहे. उन्नाव येथे दलित अल्पवयीन मुलीवर झालेला बलात्कार व त्या प्रकरणी भाजपाच्या आमदाराला झालेली अटक यामुळे जयंतीच्या दिवशी अप्रिय घटना घडू नयेत, असा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
डॉ. आंबेडकर जयंतीसाठी यूपीमध्ये कडक बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 2:16 AM