गांधीनगर : तरुणांनी नोकऱ्यांसाठी सरकारवर अवलंबून न राहता पानाच्या टपºया काढाव्यात, गायी राखाव्यात, या त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव यांच्या विधानानंतर नारद मुनी हे जगाची माहिती ठेवणारे त्या काळातील इंटरनेटच होते, असे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी म्हटले आहे. गुजरात विधानसभेचे अध्यक्ष राजेंद्र द्विवेदी यांनी तर त्यापुढे जात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व नरेंद्र मोदी हे दोघे ब्राह्मण असल्याचे अजब वक्तव्य केले आहे.गुजरातमध्ये झालेल्या मेगा ब्राह्मण बिझनेस समिटमध्ये राजेंद्र द्विवेदी म्हणाले की, डॉ. आंबेडकर यांना ब्राह्मण म्हणण्यात मला चुकीचे वाटत नाही. जे शिकलेले असतात, विद्वान असतात, ते ब्राह्मणच ठरतात. डॉ. आंबेडकर त्या अर्थाने ब्राह्मणच होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेहीत्या अर्थाने ब्राह्मणच आहेत. त्यांच्या या विधानावर संमेलनात जोरदार टाळ्या पडल्या असल्या तरी समाजमाध्यमांतून त्यांच्यावर टीका होत आहे.त्यांनी हे विधान केले, तेव्हा उनामधील दलितांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्यामुळे गुजरातमधील दलितांवर ही पाळी का आली, याचा विधानसभाध्यक्ष व मुख्यमंत्र्यांनी विचार करावा, असे अनेकांनी म्हटले आहे. रिपब्लिक पार्टी आॅफ इंडियाने राजेंद्र द्विवेदी यांच्या वक्तव्याचानिषेध केला आहे. ब्राह्मणच हुशार असतात, असा त्यांच्या विधानाचा अर्थ होतो आणि असे म्हणणे अन्यायकारक आहे, असे आठवले यांच्या पक्षाने म्हटले आहे.
डॉ. आंबेडकर, मोदी हे ब्राह्मण; नारद मुनी हे जगाची माहिती ठेवणारे त्या काळातील इंटरनेटच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2018 3:20 AM