नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आता खातेवाटप जाहीर झालं आहे. आरोग्य मंत्रिपदी मनसुख मांडविया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सहकार मंत्रालयाची जबाबदारी अमित शहांकडे देण्यात आली आहे. पियूष गोयल यांच्याकडून रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. त्यांच्याकडे आता केवळ वस्त्राद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाची जबाबदारी असेल. रेल्वेमंत्रिपदाचा कार्यभार अश्विनी वैष्णव यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्रिपदी यांची वर्णी लागली आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराआधी डॉ. हर्षवर्धन यांच्याकडून आरोग्य मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात आला. त्यांच्या जागी मनसुख मांडविया यांची निवड करण्यात आली आहे. मांडविया पंतप्रधान मोदींचे विश्वासू मानले जातात. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे नागरी उड्डाण मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. राज्यमंत्रिपदावरून कॅबिनेट मंत्रिपदी प्रमोशन मिळालेल्या अनुराग ठाकूर यांना माहिती आणि प्रसारण मंत्रालय देण्यात आलं आहे. याआधी ते अर्थ मंत्रालयाचे राज्यमंत्री होते.
प्रशासकीय सेवेचा दांडगा अनुभव असलेल्या अश्विनी वैष्णव यांच्याकडे रेल्वे मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. स्मृती इराणींकडे महिला आणि बालकल्याण मंत्रालयाची जबाबदारी दिली गेली आहे. उड्डाण मंत्रालय सांभाळलेल्या हरदीप सिंग पुरी यांच्याकडे आता केमिकल आणि खत मंत्रालय देण्यात आलं आहे. याशिवाय त्यांच्याकडे शहर विकास विभागाचीदेखील जबाबदारी असेल. अमित शहांकडे गृहमंत्रालयासोबतच सहकार मंत्रालयाचादेखील कार्यभार असेल. कालच या मंत्रालयाची निर्मिती करण्यात आली आहे.