Sayed Azeempeer Khadri :कर्नाटकातील तीन विधानसभांच्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे, त्यामुळे या तिन्ही ठिकाणी जोरदार प्रचार सुरू आहे. या दरम्यान, काँग्रेस नेते आणि शिगगावचे माजी आमदार सय्यद अजीमपीर खद्री (Sayed Azeempeer Khadri) यांनी सोमवारी (11 नोव्हेंबर) राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाने नवा वाद निर्माण झाला आहे.
काँग्रेसचे उमेदवार यासिर अहमद खान पठाण यांच्या शिगगाव विधानसभा पोटनिवडणुकीच्या मेळाव्यात बोलताना सय्यद अजमपीर खद्री यांनी दावा केला की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इस्लाम धर्म स्वीकारणार होते, पण शेवटी त्यांनी बौद्ध धर्माची निवड केली. त्यांनी इस्लाम स्वीकारला असता, तर संपूर्ण दलित समाजाने त्यांचे अनुसरण केले असते. दलित समाजातील अनेक प्रमुख व्यक्तींची नावेही बदलली गेली असती. आरबी थिम्मापूर रहिम खान बनले असते, डॉ. जी परमेश्वर पीर साहेब बनले असते, एल हनुमंथय्या हसन साहेब बनले असते, असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले.
खद्री यांच्या वक्तव्यापासून काँग्रेसने दुरावलेयावेळी खद्रींनी दलित आणि मुस्लिम समाजातील ऐतिहासिक संबंधांवर प्रकाश टाकला आणि दलित वस्त्यांजवळ मुस्लिम दर्ग्यांच्या उपस्थितीचाही उल्लेख केला. त्यांची टिप्पणी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने या विधानांपासून स्वतःला दूर केले. खद्रींच्या विधानाच्या वेळी आमदार नागराज यादव मंचावर होते. मीडियाशी बोलताना त्यांनी याला अयोग्य विधान म्हटले. दरम्यान, यावर भाजपनेही तीव्र प्रतिक्रिया दिली.
भाजप नेत्यांची टीका
भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू म्हणाले की, 'बाबासाहेब आंबेडकर इस्लाम स्वीकारणार होते, पण शेवटी बौद्ध झाले, हे काँग्रेस नेते सय्यद अजीमपूर यांचे विधान चुकीचे आहे. बाबासाहेबांनी त्यांचे विचार त्यांच्या स्वत:च्या पुस्तकात चांगल्या प्रकारे नोंदवलेले आहेत. कृपया दिशाभूल करून बाबासाहेबांचा वारसा नष्ट करू नका, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
याशिवाय, भाजप नेते आमित मालविय यांनीदेखील या विधानाचा निषेध केला. बाबासाहेबांनी इस्लामचा विरोध केला आहे. त्यांनी इस्लामला बंदिस्त समाज किंवा केवळ मुस्लिमांसाठी मुस्लिमांचे बंधुत्व म्हटले आहे. भारताची फाळणी या पुस्तकात त्यांचे शब्द उत्तम प्रकारे नोंदवले गेले आहेत. दलित आणि मुस्लिमांमध्ये युती करण्याचा विरोधकांचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही.