नवी दिल्ली - आम आदमी पक्षाचे माजी नेते आणि हिंदीतील कवि कुमार विश्वास यांच्या ताफ्यातील व्यक्तींवर हल्ला करण्यात आल्याचे वृत्त आहे. प्राथमिक माहितीनुसार त्यांच्या सुरक्षा रक्षकांवर हा हल्ला करण्यात आला. स्वत: कुमार विश्वास यांनी सोशल मीडियातून दिली आहे. गाझियाबाद येथून अलीगढला जात असताना त्यांच्या सुरक्षा रक्षकांवर हा हल्ला करण्यात आला. याप्रकरणी एका कारचालकावर आरोप करण्यात आला असून विश्वास यांनी पोलिसांना माहिती दिली. मात्र, दुसरीकडे विश्वास यांच्या सुरक्षा रक्षकांकडूनच मारहाण झाल्याचा आरोप कारचालकालाने केला आहे.
कुमार विश्वास यांनी सोशल मीडिया अकाऊंट ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली. अलिगढसाठी जात असताना आज वसुंधरा येथील घरातून निघालो तेव्हा कॉर्नरवर एका कारचालकाने माझ्या सुरक्षा रक्षकांच्या कारवर दोन्ही बाजूंनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे खाली उतरुन सुरक्षा रक्षकांनी कार चालकास विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळीही, या कारचालकाने ना केवळ युपी पोलीस शिपाई तर केंद्रीय दलाचे सुरक्षा रक्षकांवरही हल्ला केला. याप्रकरणी पोलिसांना माहिती दिली आहे.
या हल्ल्यामागचे कारण अद्यापही समजू शकले नाही. मात्र, देवाने सर्वांना चांगली बुद्धी द्यावी, देवाने सर्वांना सुरक्षित ठेवावे. आपल्या सर्वांच्या शुभेच्छांबद्दल आभार... असे ट्विट कुमार विश्वास यांनी केले आहे. दुसरीकडे पल्लव वाजपेयी नावाच्या डॉक्टरांनी कुमार विश्वास यांच्या सुरक्षा रक्षकांवरच मारहाण केल्याचा आरोप केला आहे. हिंडन नदीच्या किनाऱ्याजवळ हा वाद झाला. कुमार विश्वासच्या गाडीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नातून हा वाद निर्माण झाला आहे. सिव्हील ड्रेस परिधान केलेल्या सुरक्षा रक्षकांनी मला मारहाण केली, असा आरोप डॉक्टर वाजपेयी यांनी केला आहे.
दरम्यान, बुधवारी केवी नाईट कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्यासाठी, कुमार विश्वास अलिगढसाठी रवाना झाले असता, वाटेतच ही वादाची घटना घढली. याप्रकरणी, पोलिसांत नोंद झाली असून अद्याप पोलिसांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.