नवी दिल्ली : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास सीबीआयने जलदगतीने करावा आणि गुन्हेगारांना शासन करावे, ही मागणी हमीद दाभोलकर यांनी गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे केली. त्या वेळी त्यांनी यावर आपले लक्ष असून, तपासाची गती वाढविण्याच्या सूचना मी देतो, असे सांगितले. यानंतर समिती सदस्यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेतली. त्यांनाही निवेदन दिले. राहुल गांधी यांनी याबाबत राज्य सरकारकडून काही मदत हवी असल्यास मी सांगतो, असे सांगून हल्लेखारांना अटक झाली पाहिजे, यासाठी सरकारवर दबाव आणू, असे सांगितले. पत्रकारांना हमीद यांनी सांगितले, की २० आॅगस्ट रोजी त्यांच्या हत्येला एक वर्ष होईल. सरकारने या काळात कोणतीच ठोेस भूमिका घेतली नाही याचे आश्चर्य वाटते. पुणे पोलिसांनी बघ्याचीच भूमिका घेतल्याचे दिसते. पुणे पोलिसांनी तपासासंदर्भात फ्लॅन्चेटच्या माध्यमातून केल्या गेलेल्या प्रयत्नांच्या आरोपाची चौकशी केली जावी व संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. (विशेष प्रतिनिधी)
डॉ. दाभोलकर हत्येचा तपास जलदगतीने करू
By admin | Published: July 17, 2014 2:14 AM