मुंबई : जगातील वैद्यकीय विश्वाला ओआरएसच्या रूपाने (ओरल रिहायड्रेशन सोल्युशन) संजीवनी देणारे डॉ. दिलीप महालनाबिस यांचे सोमवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांनी वयाच्या ८८ व्या वर्षी कोलकात्याच्या खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या या संशोधनाने जगभरातील असंख्य नागरिक आणि बालकांचे मृत्यू प्रमाण कमी झाले. जुलाब आणि उलट्या झाल्यानंतर मोठया प्रमाणात रुग्णांना अशक्तपणा येतो. शरीरातील पाणी आणि मिठाचे प्रमाण कमी होते, त्या काळात ओआरएस दिल्याने रुग्णाला आराम मिळतो. डॉ. महालनाबिस यांच्या या संजीवनीला जगभरात स्वीकारले गेले आहे.
डॉ. दिलीप महालनाबिस यांचा जन्म १२ नोव्हेंबर १९३४ साली झाला. त्यांचे वैद्यकीयचे शिक्षण कोलकाता वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथून झाले. लंडन येथे दोन वर्षे नॅशनल हेल्थ सर्व्हिस येथे काम करून व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून ते कोलकात्याला परतले. त्यानंतर त्यांनी १९६६ साली ओआरएस या विषयावर संशोधन करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांच्यासोबत डॉ. डेव्हिड आर. नलीन आणि डॉ. रिचर्ड ए. कॅश सोबत होते.
बांगलादेश मुक्तिसंग्राम आणि...१९७१ साली बांगलादेश मुक्तिसंग्रामात लाखो बांगलादेशी नागरिक बंगालात विस्थापित झाले होते. त्यावेळी कॉलरा या साथीच्या आजाराची मोठ्या प्रमाणात लागण झाली होती.
मोठ्या प्रमाणात साथ पसरल्यामुळे हाताच्या शिरेतून देणाऱ्या औषधाची कमतरता भासू लागली होती. त्यावेळी डॉ. महालनाबिस यांनी ओआरएस मोठ्या प्रमाणात दिले. त्यामुळे ३० टक्क्यांपेक्षा मृत्यूचे प्रमाण कमी होऊन ३ टक्क्यांपर्यंत आले. त्यांच्या या प्रयोगानंतर ओआरएसची संपूर्ण जगात चर्चा झाली. या सोप्या पद्धतीला जगभरात गौरविले गेले.
पाणी, मीठ, बेकिंग सोडा आणि ग्लुकोज या मिश्रणाची जागतिक आरोग्य संघटनेने दखल घेतली. २००२ मध्ये डॉ. महालनाबिस यांना कॉर्नवेल येथील कोलंबिया विद्यापीठाने प्रतिष्ठित पोलिन बक्षीस देऊन गौरविण्यात आले. थाई सरकारनेही २००६ साली डॉ. महालनाबिस यांना प्रिन्स माहीडोल अवॉर्ड देऊन त्यांचा गौरव केला होता.
डॉ. महालनाबिस यांनी ओआरएसच्या रूपाने मोठे वरदान वैद्यकीय व्यस्थेला दिले आहे. त्यांच्या या संशोधनाची दखल जगभरातील सर्व प्रतिष्ठित वैद्यकीय संशोधन करणाऱ्या जर्नलमध्ये घेतली होती. या संशोधनाने करोडो नागरिक आणि बालकांचे मृत्यू कमी होण्यास मदत झाली. त्यांचे काम शब्दात मांडणे अवघड आहे. ओआरएस ही शास्त्रशुद्ध पद्धत आहे. घरी आपण त्याला पर्याय म्हणून योग्य प्रमाणात मीठ, पाणी, साखर यांच्या मिश्रणाचा वापर करतो.- डॉ. सुहास प्रभू, वरिष्ठ बालरोग तज्ज्ञ