लातूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीची स्मृति म्हणून महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी सुरू करण्याचा संकल्प बाळगला आहे. हा स्तुत्य उपक्रम असून, ही साहित्य अकादमी तात्काळ सुरू करण्याची सूचना अस्मितादर्श साहित्य संमेलनात ठराव घेऊन करण्यात आली. दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात ३४ व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी संमेलनाध्यक्षा डॉ. प्रज्ञा दया पवार, ताराचंद्र खांडेकर, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या उपस्थितीत झाला. या संमेलनात एकूण १० ठराव घेण्यात आले. प्रा.एस.एन. शिंदे यांनी ठरावाचे वाचन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखनाचे जे खंड महाराष्ट्र शासनाने इंग्रजी भाषेत प्रकाशित केले आहे, त्या समग्र खंडांचा अनुवाद मराठी, हिंदी आणि भारतातील प्रादेशिक भाषेत करावा, असा ठरावही यावेळी पारित करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखनाचे खंडात्मक पुनर्मुद्रण करून ते वाचकांना उपलब्ध करून द्यावे, डॉ. बाबासाहेबांच्या चळवळीत ज्या कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला, अशा कार्यकर्त्यांना सामाजिक स्वातंत्र्यसैनिक समजून त्यांना स्वातंत्र्यसैनिकांच्या सवलती द्याव्यात, विपुल प्रमाणात पाली वाङ्मय उपलब्ध आहे. मात्र या वाङ्मयाचा स्वतंत्र संशोधनात्मक शोध घेण्यासाठी स्वतंत्र विद्यापीठाची आवश्यकता आहे. जगभरातील अभ्यासक आणि संशोधकांच्या सोयीसाठी पाली भाषा व वाङ्मय विद्यापीठाची स्थापना करावी, असाही ठराव घेण्यात आला. मराठी भाषेचा जन्म मराठवाडा प्रदेशात झाल्याचे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध झाले आहेत. म्हणून महाराष्ट्र शासनाने मराठी भाषा व वाङ्मय विद्यापीठ अंबाजोगाई येथे स्थापन करावे, अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पाठविण्याची योजना राज्य शासनाने बंद केली आहे. ही बाब अन्यायकारक असून, ही योजना पूर्ववत सुरू करण्यात यावी, लातूर येथे सांस्कृतिक सभागृह सुरू करावे, अनुसूचित जाती-जमाती संरक्षण कायदा (ॲट्रॉसिटी) संबंधाने समाजात संभ्रमाचे वातावरण निर्माण केले जात आहे. त्यामुळे या कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, अशीही मागणी संमेलनाच्या समारोपात करण्यात आली.डॉ. गंगाधर पानतावणे, डॉ. भगवान वाघमारे, डी.एस. नरसिंगे, जयप्रकाश दगडे, शंकर भारती, राजेंद्र लातूरकर, डॉ. विजय अजनीकर, डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी हे ठराव मांडले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी स्थापन करा अस्मितादर्श साहित्य संमेलनात ठराव
By admin | Published: January 16, 2017 12:47 AM