हरिश गुप्ता नवी दिल्ली : संसदेत दहा दिवसांपासून निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी सत्ताधारी भाजपाने जोरदार प्रयत्न सुरू केले असून, डॉ. मनमोहन सिंगांच्या दुखावलेल्या भावनांवर सरकार आज फुंकर घालणार असल्याचे कळते. त्यामुळे उरलेल्या दिवसांमध्ये तरी कामकाज नीट चालेल अशी शक्यता आहे.सभागृहातील कोंडी फोडण्यासाठी राज्यसभेतील नेते व अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मंगळवारी विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांच्या भेटींवर भेटी घेतल्या. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या दुखावलेल्या भावनांवर फुंकर घालण्यासाठी निवेदनाचा मसुदा तयार केला गेला आहे, असे कळते. डॉ. मनमोहन सिंग हे त्यांचा प्रामाणिकपणा व देशभक्तीबद्दल इतर कोणी नाही, तर स्वत: पंतप्रधानांनी प्रश्न उपस्थित केल्यामुळे दुखावले गेले होते. काँग्रेसनेही डॉ. सिंग यांचा सन्मान हा सर्वोच्च असल्याचे मत व्यक्त केले आहे.डॉ. सिंग यांच्याशी संसदीय कामकाज राज्यमंत्री विजय गोयल यांनी तासभर चर्चा केली. या दोघांमध्ये काय चर्चा झाली ते समजले नाही, परंतु सिंग यांनी संसदेचे कामकाज चालले पाहिजे आणि माझ्या प्रतिष्ठेचा मुद्दा करण्याच्या मी विरोधात आहे, असे मत व्यक्त केले.>मोदी करणार निवेदननाताळनंतर कामकाज सुरू झाले की पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत निवेदन वाचून दाखवले जाईल, असा निर्णय झाल्याचे कळते. मोदी यांचा राज्यसभेत उपस्थित राहण्याचा दिवस बुधवार नाही. परंतु निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी ते मुद्दाम उपस्थित राहणार असल्याचेही समजते.
डॉ. मनमोहन सिंग यांच्या दुखावलेल्या भावनांवर सरकार आज फुंकर घालणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 4:00 AM