ऑनलाइन लोकमत नवी दिल्ली, दि. २० - डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे कैवारी नव्हते तर ते समस्त मानवजातीचे कैवारी होते असे सांगतानाच कृपया बाबासाहेबांना एका जातीमध्ये अडकवून ठेवू नका. डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते म्हणून मी आज या ठिकाणी उभा आहे असे सांगत डॉ. आंबेडकरांविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गौरवोदगार काढले. दिल्लीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी पंतप्रधान बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी लढा दिला असून महिलांना योग्य न्याय मिळावा यासाठी कायदे केले, महिलांना मतदानांचा अधिकार बहाल केला, बाबासाहेबांनी कामगारांसाठी लढा दिला, कामगारांना १२ तासांऐवजी ८ तास काम करता यावे यासाठी कायद्यात तरतूद केली. महत्वाचा शिक्षणाचा मूलमंत्र बाबासाहेबांनी दिला, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असून ज्या दिवशी शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण मिळेल तो दिवस ख-या अर्थाने बाबासाहेबांना आदरांजलीचा दिवस ठरेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे कैवारी नव्हते त्यामुळे त्यांना एका जातीत अडकवू नका. निवडणुकांचे महत्व लक्षात घेवून बाबासाहेबांनी स्वतंत्र निवडणूक आयोग स्थापन करण्याची संकल्पना मांडली. तसेच स्वतंत्र वित्त आयोग स्थापन करण्याची संकल्पना मांडली असे मोदी म्हणाले.
डॉ. आंबेडकरांमुळेच मी या ठिकाणी - पंतप्रधान मोदी
By admin | Published: April 20, 2015 7:27 PM