नवी दिल्ली : ‘सगळी सोंगं आणता येतात, मात्र पैशाचं सोंग आणता येत नाही’ या उक्तीनुसार देशाला आर्थिक अडचणींतून सहिसलामत बाहेर काढण्याची किमया करून दाखवणारे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने अवघा देश जणू स्तब्ध झाला आहे. अवघ्या जगभरातून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात येत असून जगभरातील प्रमुख नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
डॉ. सिंग यांच्या पार्थिवावर शनिवारी दिल्लीत अंत्यसंस्कार होतील. त्यापूर्वी, सकाळी साडेआठ ते साडेनऊ या वेळेत त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी काँग्रेसच्या मुख्यालयात ठेवण्यात येईल. तेथे सामान्य नागरिक डॉ. सिंग यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊ शकतील. त्यानंतर सकाळी साडेनऊला अंत्ययात्रा निघेल. डॉ. सिंग यांच्या पार्थिवाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अनेकांनी अंतिम दर्शन घेतले.
निगमबोध घाट येथे होतील अंत्यसंस्कार
दिवंगत मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर संपूर्ण शासकीय इतमामात दिल्लीतील निगमबोध घाट येथे सकाळी पावणे बारा वाजता अंत्यसंस्कार केले जातील, अशी माहिती गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
अंत्यसंस्कार संपूर्ण शासकीय इतमामात पार पडावेत, यादृष्टीने योग्य ती तयारी करण्याची सूचना संरक्षण मंत्रालयाला देण्यात आल्या आहेत.
त्यापूर्वी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अशी विनंती केली होती की, मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर अशा ठिकाणी अंत्यसंस्कार केले जावेत जेथे त्यांचे स्मारक बनवणे शक्य होईल.
सात दिवस दुखवटा, राष्ट्रध्वज अर्ध्यावर
मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे देशभरात सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असून इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात आले आहेत. या कालावधीत सरकारतर्फे मनोरंजन कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार नाही.
केंद्रीय मंत्रिमंडळात शोक, नेत्यांचे अंत्यदर्शन
मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीव्र शोक व्यक्त करण्यात आला. राष्ट्रध्वजात गुंडाळलेले मनमोहन सिंग यांचे पार्थिव त्यांच्या ३, मोतीलाल नेहरू मार्ग या निवासस्थानी आणण्यात आले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस सरचिटणीस खा. प्रियांका गांधी, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आदींनी अंतिम दर्शन घेतले.