Manmohan Singh: आर्थिक सल्लागार ते देशाचे पंतप्रधान; अशी राहिली डॉ. मनमोहन सिंग यांची कारकीर्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 23:53 IST2024-12-26T23:51:44+5:302024-12-26T23:53:12+5:30
Manmohan Singh Death: केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही कायम आहे.

Manmohan Singh: आर्थिक सल्लागार ते देशाचे पंतप्रधान; अशी राहिली डॉ. मनमोहन सिंग यांची कारकीर्द
Dr Manmohan Singh's Journey: भारताचे माजी पंतप्रधानडॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. देशाचे चौदावे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. ऋजू स्वभाव, कठोर परिश्रम करण्याची तयारी व कामाप्रती असलेली बांधिलकी यासाठी ते ओळखले जात. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या डॉ. सिंग यांचा राजकीय प्रवास विस्मयचकित करणारा ठरला.
१९७१ साली डॉ. मनमोहन सिंह केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून रुजू झाले. १९७२मध्ये त्यांची अर्थ मंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. मनमोहन सिंग यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष; भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. डॉ. मनमोहनसिंग हे १९९१ ते १९९६ या काळात देशाचे अर्थमंत्री होते. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही कायम आहे.
१९९१-९६ दरम्यान पीव्ही नरसिंह राव सरकारमध्ये ते केंद्रीय अर्थमंत्री होते. अर्थमंत्री असताना त्यांनी देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी क्रांतिकारी प्रयत्न केले होते. त्यांना देशाच्या आर्थिक सुधारणांचे शिल्पकार म्हटले जाते. राजकारणात येण्यापूर्वी मनमोहन सिंग १९८५ ते १९८७ या काळात नियोजन आयोगाचे प्रमुख होते. त्यापूर्वी ते १९८२ ते १९८५ या काळात RBIचे गव्हर्नरही होते. बँकिंग क्षेत्रातील सुधारणांचे श्रेयही त्यांना जाते.
डॉ. मनमोहन सिंग हे २००४ ते २०१४ या काळात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए वन आणि यूपीए टूच्या काळात देशाचे पंतप्रधान होते. डॉ. सिंग यांनी २२ मे २००४ रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यानंतर २२ मे २००९ रोजी ते दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले. पंतप्रधानपदाच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले.
दरम्यान, मनमोहन सिंग यांच्यामागे पत्नी गुरशरण कौर व तीन कन्या असा परिवार आहे.