नवी दिल्ली : इबोला आजारावर बनविण्यात आलेले रेमडिसिव्हिर हे औषध कोरोना साथीवरही रामबाण ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे भावी काळात रेमडिसिव्हिरची १२७ देशांमध्ये विक्री करण्यासाठी गिलिड सायन्सेस या उत्पादक कंपनीसोबत डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज या कंपनीने करार केला आहे.त्यानुसार डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज रेमडिसिव्हिरचे उत्पादन करून विविध देशांत त्याची विक्री करू शकते. या औषधाच्या उत्पादनासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान साहाय्य गिलिड सायन्सेस कंपनीकडून डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजला मिळणार आहे. कोरोना रुग्णांना तातडीच्या उपचारांमध्ये रेमडिसिव्हिर औषधाचा वापर करण्याची परवानगी अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने (यूएसएफडीए) गिलिड सायन्सेस कंपनीला दिली होती. रेमडिसिव्हिरचे उत्पादन करून या औषधाची अमेरिका व युरोप वगळून अन्य १२७ देशांमध्ये विक्री करण्यासाठी भारतातील सिप्ला, ज्युबिलियंट लाईफसायन्सेस या कंपन्यांनी याआधीच गिलिड सायन्सेस या कंपनीशी करार केला आहे. त्या मालिकेत आता डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज या कंपनीचा समावेश झाला आहे.देशात उत्पादन सुरू होण्याची शक्यतारेमडिसिव्हिर औषधावर अद्यापही चाचण्या सुरू आहेत. पण देशातील कोरोना साथीची स्थिती लक्षात घेता, त्या आजाराच्या रुग्णाला तातडीच्या उपचारांमध्ये रेमडिसिव्हिर औषध देण्यास देशातील ड्रग कंट्रोलर जनरल आॅफ इंडियाने नुकतीच परवानगी दिली होती. आता या औषधाचे देशातच लवकर उत्पादन सुरू होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. रेमडिसिव्हिरचे उत्पादन व विक्री करण्यासाठी परवानगी मिळविण्याकरिता देशातील चार कंपन्यांनी केंद्र सरकारकडे अर्ज दाखल केले आहेत, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.
CoronaVirus News: १२७ देशांमध्ये विक्री करणार रेमडिसिव्हिर; भारतीय कंपनीचा करार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 4:00 AM