नवी दिल्ली : भाजपाच्या सदस्यांची इच्छा नसूनही माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आग्रह धरल्याने वित्त खात्याशी संलग्न संसदीय स्थायी समितीने नोटाबंदीच्या संदर्भात आणखी माहिती घेण्यासाठी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल यांना येत्या २५ मे रोजी पुन्हा पाचारण करण्याचे ठरविले आहे.डॉ. पटेल गेल्या वेळी समितीपुढे आले होते तेव्हा समितीच्या सदस्यांनी प्रश्नांची सरबत्ती करून त्यांना कोंडीत पकडले होते. त्यावेळी डॉ. मनमोहन सिंग त्यांच्या मदतीला धावून आले होते. पूर्वी स्वत: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर राहिलेले डॉ. सिंग असे म्हणाले होते की, एक संस्था म्हणून रिझर्व्ह बँकेला मान द्यायला हवा व गव्हर्नरनी त्या संस्थेची भूमिका मांडल्यानंतर त्यांना अडचणीचे प्रश्न विचारले जाऊ नयेत.समितीच्या सदस्यांमधील सूत्रांनी सांगितले की, नोटाबंदीसंबंधी सदस्यांना आणखी माहिती घ्यायची आहे. पण त्यासाठी आता फक्त वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना बोलवावे, असे निशिकांत दुबे यांच्यासह समितीवरील भाजपा सदस्यांचे मत होते. परंतु डॉ. मनमोहन सिंग यांच्या पुढाकाराने विरोधी पक्षांच्या सदस्यांनी आग्रह धरल्यावर डॉ. उर्जित पटेल यांना पुन्हा बोलाविण्याचे ठरविण्यात आले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
डॉ. उर्जित पटेल येणार पुन्हा संसदीय समितीपुढे
By admin | Published: April 21, 2017 2:03 AM