ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. 01 - प्रख्यात संशोधक आणि ‘परम’ महासंगणकाचे निर्माते डॉ. विजय भटकर यांनी बिहारमधील नालंदा विद्यापीठाचे कुलगुरु म्हणून बुधवारी पदभार स्वीकारला. डॉ. विजय भटकर यांनी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु पंकज मोहन यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी बिहारचे मुख्यंमत्री नितीश कुमार यांच्यासह विद्यापीठाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
नालंदा विद्यापीठातून विद्यार्थांना फक्त पदव्या देण्याचं काम न करता समाज आणि समुदायाच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने काम करण्यास प्रेरणा देऊया, असे यावेळी डॉ. विजय भटकर यांनी सांगितले. विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून डॉ. विजय भटकर तीन वर्षे काम पाहतील.
महासंगणकाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्या ‘सी-डॅक’च्या स्थापनेत डॉ. विजय भटकर यांचा मोलाचा वाटा आहे. याशिवाय त्यांनी आयआयटी, ईटीएच रिचर्स लॅब, एमकेसीएल आणि इंडिया इंटरनॅशनल मल्टियुनिव्हर्सिटी अशा राष्ट्रीय संस्थांच्या स्थापनेतही प्रमुख सहभाग नोंदविला आहे.
डॉ. विजय भटकर यांनी भारत सरकारच्या विज्ञान सल्लागार समितीचे सदस्य म्हणून काम पाहिले आहे. सीएसआरच्या नियामक परिषदेचे ते सदस्य होते. महाराष्ट्र आणि गोवा सरकारच्या ई-गव्हर्नन्स समितीवर त्यांनी काम केले आहे. देशातील आघाडीच्या विज्ञान, अभियांत्रिकी आणि व्यावसायिक संस्थांवर ते काम करीत आहेत. तसेच, त्यांना पद्मभूषण, पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कारांनी केंद्र सरकारने यापूर्वीच गौरविले आहे.