- हरिश गुप्ता । लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : राष्ट्रपतिपदासाठी उमेदवार ठरविण्याच्या हालचालींना वेग आला असून, सोमवारी होणाऱ्या सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत याचा निर्णायक टप्पा गाठला जाण्याची शक्यता आहे. या बैठकीत उमेदवार ठरविण्याचे अधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले जातील, असे दिसते. राष्ट्रपतिपदासाठी ख्यातनाम संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांचे नाव पुढे आले आहे.अण्णाद्रमुकचे दोन्ही गट, तेलंगण राष्ट्र समिती, वायएसआर काँग्रेससह आघाडीतील इतर काही छोटे पक्ष त्यांच्या पाठिंब्याची औपचारिक पत्रे मंगळवारपर्यंत पंतप्रधानांकडे पाठवतील, असे समजते. परंतु आपण निवडलेल्या उमेदवाराला शिवसेनेकडून बिनशर्त पाठिंबा मिळावा, असा भाजपाचा प्रयत्न असेल. म्हणूनच हा उमेदवार मूळचा महाराष्ट्रातील असेल, तर शिवसेना व राष्ट्रवादीलाही त्यास पाठिंबा देणे भाग पडेल, असे गणित भाजपा मांडत असल्याचे समजते. याच पार्श्वभूमीवर नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू व ख्यातनाम संगणकतज्ज्ञ डॉ. भटकर यांचे नाव शनिवारी सत्ताधारी वर्तुळात चर्चेत आले.राज्यसभेवरील नियुक्त सदस्य डॉ. नरेंद्र जाधव, लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन व परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची नावेही राजकीय वर्तुळात असली, तरी उच्चपदस्थ सूत्रांनुसार राष्ट्रपतिपदासाठी निवड करण्यासाठी आवश्यक निकषात चपखल बसणारे नाव या दृष्टीने डॉ. भटकर यांच्या नावाचा विचार केला जात आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, डॉ. भटकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी दीर्घ क्षेत्रातील वादीतीत असे विद्वान आहेत. ‘ल्वदेशी विज्ञाना’चा प्रसार-प्रचार करणाऱ्या ‘विज्ञान भारती’ या संघप्रणीत संस्थेशी डॉ. भटकर बराच काळ संबंधित होते. दिल्ली आयआयटीच्या ‘बोर्ड आॅफ गव्हर्नर’चेही ते अध्यक्ष होते. पुण्यात ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट आॅफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (सिडॅक)ची स्थापना करून डॉ. भटकर यांनी ‘सुपर कॉम्प्युटिंग’च्या क्षेत्रात भारताला मानाच्या पंक्तीत बसविले होते. त्यांच्याच प्रयत्नांतून ‘परम ८०००’ व ‘परम १०००००’ हे भारताचे पहिले सुपर कॉम्प्युटर तयार झाले होते. सन २००० मध्ये ‘पद्मश्री’ व सन २०१५ मध्ये ‘पद्मभूषण’ किताबाने त्यांच्या कार्याचा गौरव केला गेला. सरकारच्या शिफारशीवरून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी यंदाच्या जानेवारीत त्यांची ‘व्हिजिटर’ म्हणून नेमणूक केली.महाजन, स्वराज यांना पर्याय कोण?सुषमा स्वराज आणि सुमित्रा महाजन यांची नावेही संभाव्य उमेदवार म्हणून गांभीर्याने चर्चेत आली होती. स्वराज यांची स्वीकारार्हता व्यापक असून कदाचित काँग्रेसचाही त्यांच्या नावाला पाठिंबा मिळेल, असे मानले गेले. शिवाय गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेने त्यांचे नाव पंतप्रधानपदासाठीही पुढे केले होते. त्यामुळे राष्ट्रपतीपदासाठी त्यांच्या नावास शिवसेनेचा विरोध असणार नाही, असे मानले जाते. पण मंत्रिमंडळात अनुभवी व बुद्धिमान मंत्र्यांची आधीच वानवा असताना स्वराज यांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवण्यास पंतप्रधान मोदी फारसे उत्सूक नसल्याचेही समजते.काही दिवसांपूर्वी सुमित्रा महाजन पंतप्रधानांना भेटल्या तेव्हा त्यांच्या संभाव्य उमेदवारीचा विषय संक्षेपाने चर्चेत आल्याचे सांगितले जाते. पंतप्रधानांनी महाजन यांची स्तुती केली असून सभागृहातील सध्याची रचना पाहता अध्यक्षांच्या खुर्चीत सुमित्राताई नसतील तर लोकसभा चालविणे अत्यंत अवघड जाईल, असे मोदींनी त्यांच्या अपरोक्ष इतरांना बोलून दाखविल्याचेही सूत्र सांगतात. त्यामुळे सभागृह समर्थपणे चालवू शकेल असे दुसऱ्या कोणाचे तरी नाव लोकसभा अध्यक्षपदासाठी तुम्हीच सुचवा, असे मोदी महाजन यांना म्हणाल्याचेही कळते.विरोध होण्याची शक्यता कमीडॉ. भटकर हे एक वादातीत असे सन्माननीय व्यक्तिमत्त्व असून, त्यांचे नाव पुढे केले, तर त्यास विरोध करण्यास शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला कोणतेही कारण असणार नाही, असे भाजपातील श्रेष्ठींना वाटते.डॉ. जाधव यांच्याविषयी साशंकताडॉ. नरेंद्र जाधव हे दलित विचारवंत असल्याने, रा. स्व. संघाच्या शिफारशीवरूनच त्यांची राज्यसभेवर नियुक्ती केली गेली होती, परंतु त्यांना प्रत्यक्ष संघाच्या कार्याची पार्श्वभूमी नाही. त्यामुळे त्यांना राष्ट्रपती भवनात पोहोचण्यासाठी हे कितपत उपयोगी पडेल, याविषयी साशंकताही व्यक्त केली जात आहे.संघाला हवा हिंदुत्ववादीज्यांची हिंदुत्ववादी विचारांशी बांधिलकी आहे, अशी व्यक्ती राष्ट्रपतिपदासाठी निवडली गेलेली आपल्याला आवडेल, असे रा. स्व. संघाच्या नेतृत्वाने भाजपाला स्पष्टपणे कळविले आहे. राष्ट्रपतिपदाची निवडणूक ही तत्त्वप्रणालीची लढाई आहे व ती काँग्रेस संस्कृतीशी सूतराम संबंध नसलेल्या व्यक्तीनेच जिंकायला हवी, असा संघाचा आग्रह आहे.मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व सरसंघचालक मोहन भागवत यांच्यात झालेली भेट ही निव्वळ सदिच्छा भेट होती, अशी संघाच्या केशवकुंज मुख्यालयाने सारवासारव केली होती. स्वत: मुखर्जी यांनी भागवत यांना भोजनाचे निमंत्रण दिले होते, असा खुलासाही संघाने केला होता. राष्ट्रपतींचे निमंत्रण झिडकारणे शिष्टाचाराला सोडून झाले असते, म्हणून रुद्रपूरची भेट अर्धवट सोडून भागवत दिल्लीला आले होते. मुखर्जींच्या भेटीनंतर पंतप्रधानांशी फोनवर बोलून भागवत रुद्रपूरला परतले होते, असेही समजते.