नवी दिल्ली : पूर्व लडाखच्या सीमेवर निर्माण झालेला तणाव निवळण्यासाठी दिलेला शब्द चीनने पुन्हा एकदा फिरवला आहे. सप्टेंबरमध्ये स्वत: सुचविलेल्या उपायांचे ड्रॅगनने उल्लंघन केले असून, बेमालूमपणे सैनिकांची संख्या वाढविल्याचे उघडकीस आले आहे. याच पार्श्वभूमीवर दाेन्ही देशांच्या कमांडरस्तराच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये रविवारी चर्चेची नववी फेरी पार पडली. त्यात भारताने या मुद्द्यावरून तीव्र आक्षेप नाेंदविल्याची माहिती सुत्रांनी दिली.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर लडाखच्या देपसांगजवळ प्रत्यक्ष ताबारेषेजवळ माेक्याच्या ठिकाणी चीनने गुपचूप आणि टप्प्याटप्प्याने सैनिकांची संख्या वाढविली आहे. सीमेजवळ स्वत:ची स्थिती भक्कम करण्याचा ड्रॅगनने प्रयत्न केला आहे. सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर चीनने शब्द फिरवल्याचे उघडकीस आले आहे. देपसांगसह दाैलत बेग ओल्डीच्या जवळ चीनने नव्या ठिकाणांवर सैनिक तैनात केले आहेत.
भारतही सज्जचार महिन्यांनंतर आढावा घेतल्यानंतर चीनने सीमेजवळ सैनिकांची संख्या वाढविल्याचे उघड झाले आहे. परिणामी भारतीय लष्करालाही या कृतीला उत्तर देणे अपरिहार्य झाले आहे. कडाक्याच्या थंडीमध्येही लष्करी दलांना जवळच तैनात करण्यात आले आहे.
सैन्य मागे घेण्याबाबत चर्चायापूर्वी ६ नाेव्हेंबरला झालेल्या चर्चेत दाेन्ही देशांनी संघर्षाच्या ठिकाणांवरून सैन्य मागे घेण्याबाबत चर्चा झाली हाेती. त्यानंतर रविवारी झालेल्या चर्चेतही हाच मुद्दा प्रामुख्याने मांडण्यात आला. पर्वतीय क्षेत्रातील संघर्षाच्या ठिकाणांवरून सैन्य मागे घेऊन तणाव कमी करण्याची जबाबदारी चीनची असल्याची भूमिका भारताने कायम घेतली आहे. चीनने भारताकडे चेंडू ढकलला हाेता. मात्र, ही प्रक्रिया दाेन्ही देशांकडून एकाच वेळी हाेईल, असे भारताने स्पष्ट केले हाेते.