नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे आपल्या ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असतात. मात्र आता पुन्हा एकदा एका वेगळ्याच कारणामुळे राहुल गांधींची चर्चा रंगली आहे. मध्य प्रदेशच्या इंदूर शहरामध्ये एक विचित्र घटना घडली आहे. इंदूर विमानतळाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एका महिलेने जोरदार गोंधळ घालत आपल्याला विमानतळावर प्रवेश देण्याची मागणी केली. विशेष म्हणजे या महिलेने मी राहुल गांधींशी लग्न करायला चालले आहे. मला दिल्लीला जाऊ द्या असं म्हणत विमानतळावर गोंधळ घातला आहे. विमानाचं कोणतंही तिकीट नसताना महिलेला विमानतळावर प्रवेश करायचा होता.
मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने विमानतळावर चांगलाच गोंधळ घातला. तिकीट नसतानाही ही महिला बरंच सामान घेऊन विमानतळावर आपल्याला प्रवेश देण्यात यावा यासाठी सुरक्षारक्षकांसोबत वाद घालत होती. सुरक्षारक्षकांनी तिला थांबवलं तेव्हा ही महिला सुरक्षारक्षकांनाच धमकी देऊ लगाली. मी राहुल गांधींची होणारी पत्नी आहे असं सांगितलं. तसेच राहुल गांधी मला भेटायला येत नाहीत म्हणून मीच त्यांना भेटायला दिल्लीला जात आहे. मला त्यांच्याशी लग्न करायला जायचं आहे. जेव्हा माझं लग्न होईल तेव्हा तुम्ही सर्वजण मला सलाम कराल असंही ही देखील महिलेने सुरक्षारक्षकांना म्हटलं आहे.
सुरक्षारक्षकांनी महिलेला बराच वेळ समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र या महिलेने गोंधळ सुरूच ठेवला. अखेर पोलिसांना बोलवण्यात आलं. पोलिसांनी या महिलेची चौकशी केली असता ती महिला परदेशीपूरा येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी याबाबत अधिक तपास केला असता चौकशीमध्ये ही महिला मानसिक रुग्ण असल्याची माहिती मिळाली. गेल्या काही दिवसांपासून ही महिला आपल्या घरातून पळून जात असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली. अनेकदा ही महिला घरातून पळून जाते आणि बाहेरच्या लोकांशी कोणत्याही कारणावरुन वाद घालत असल्याचं समोर आलं आहे.
काही दिवसांपूर्वीच इंदूर विमानतळावर अशाच प्रकारचा गोंधळ पाहायला मिळाला होता. एरोड्रम पोलीस आणि सीआयएसएफने हैदराबादवरुन आलेल्या एका प्रवासी मानसिक रुग्ण असल्याचे सांगत त्याला एमव्हायएच रुग्णालयामध्ये पाठवलं होतं. नंतर ही व्यक्ती फ्रॅब्रिकेशन व्यापारी असल्याचं समजलं. पोलिसांच्या वागण्यामुळे या व्यक्तीच्या नातेवाईकांना बराच मनस्ताप सहन करावा लागला. 40 वर्षीय रमेश हे 11 जानेवारी रोजी उज्जैन येथे देवदर्शनासाठी आले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
"राहुल गांधींना सीमेवर मायनस तापमानात का उभं करू नये?", भाजपा नेत्याचा सवाल
राहुल गांधी यांनी भारतीय सैन्याबाबत केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या विधानवरून भाजपाने त्यांना घेरल्याचं पाहायला मिळत आहे. हरियाणाचे मंत्री आणि भाजपा नेते अनिल विज (Anil Vij) राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. राहुल गांधी यांनी देशाच्या जवानांचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच राहुल गांधी यांना देशाच्या सीमेवर मायनस तापमानात का उभं करू नये? असा सवाल देखील अनिल विज यांनी केला आहे. विज यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. तसेच राहुल गांधींवर निशाणा साधत टीका केली आहे. "राहुल गांधी सातत्याने देशाच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या सैनिकांचा अपमान करत आहेत. ते काही गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांना मायनस तापमानात का उभं करू नये?, देशाच्या शत्रूंचा सामना करण्यासाठी उभं राहिल्यावर एका दिवसात त्यांना सर्व गोष्टी समजतील" असं अनिल विज यांनी म्हटलं आहे.