भारतीय नौदल आणि DRDO ने कमी पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या VLSRSAM क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केले आहे. शेपणास्त्राची दुसरी चाचणी गुरुवारी ओडिशातील चांदीपूर येथील परीक्षण रेंजमध्ये करण्यात आली. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हे क्षेपणास्त्र, व्हर्टिकल लॉन्चरने लॉन्च करण्यात आले होते. त्याने कमी ऊंचीवर हवेत तीव्र गतीने उडणाऱ्या लक्ष्याचा अचूक वेध घेतला आणि ते नष्ट केले.
मंत्रालयाने म्हटले आहे की, या चाचणीचा उद्देश, क्षेपणास्त्र प्रणालीतील विविध तंत्रज्ञानाचे परीक्षण करणे असाही होता. यात, 'प्रॉक्सिमिटी फ्यूज' आणि 'सीकर' यांचाही समावेश होता. महत्वाचे म्हणजे, ITR चांदीपूर येथे तैनात रडार इलेक्ट्रो-ऑप्टिकल ट्रॅकिंग सिस्टीम आणि टेलीमेट्रीसारख्या विविध उपकरणांद्वारे या प्रणालीची कार्यक्षमता तपासण्यात आली आणि तिची पुष्टी करण्यात आली.
या यशासाठी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ आणि नवदलाच्या चमूचे कौतुक करत, "ही चाचणी VLSRSAM शस्त्र प्रणालीची विश्वासार्हता आणि परिणामकारकतेची पुष्टी करते," असे म्हटले आहे.
या शिवाय, DRDO चे अध्यक्ष आणि संरक्षण संशोधन तथा विकास विभागाचे सचिव डॉ. समीर व्ही. कामत, यांनीही या चाचणीत सहभागी चमूंचे अभिनंदन करत, "ही प्रणाली भारतीय नौदलाच्या क्षमतेत लक्षणीय वाढ करेल," असे म्हटले आहे. यापूर्वी भारताने अग्नी-4 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती.