नवी दिल्ली : संरक्षण क्षेत्रामध्ये भारताची संशोधन करणारी संस्था डीआरडीओला आज मोठे यश प्राप्त झाले आहे. हवेतून हवेत मारा करू शकणाऱ्या मिसाईलची यशस्वी चाचणी घेण्यात आली. महत्वाचे म्हणजे सुखोई -30एमकेआय या लढाऊ विमानावरून हे क्षेपणास्त्र डागता येणार आहे. भारताच्या हद्दीत राहून पाकिस्तानच्या हद्दीतील विमाने या क्षेपणास्त्रामुळे पाडता येणार आहेत.
बालाकोट हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी पाकिस्तानची जवळपास 24 विमाने भारतीय हद्दीत घुसली होती. विंग कमांडर अभिनंदन यांच्यासह भारताच्या धाडसी वैमानिकांनी जुन्या लढाऊ विमानांनी अमेरिकेने पाकिस्तानला दिलेले एफ-16 हे अद्ययावत विमान पाडले होते. मात्र, या लढाईवेळी पाठलाग करताना अभिनंदन यांचे विमान अपघातग्रस्त होऊन पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन पडले होते. आता अशी वेळ भारतीय वैमानिकांवर येणार नाही.
भारतीय संस्था डीआरडीओने असे क्षेपणास्त्र विकसित केले आहे, जे हवेतल्या हवेतच 70 किमी लांबवर असलेल्या शस्त्रूच्या विमानाला उडवू शकणार आहे. पश्चिम बंगालच्या हवाई तळावरून सुखोई विमानाने आज उड्डाण केले. या अस्त्र क्षेपणास्त्राने 70 किमी दूरवर असलेल्या लक्ष्याला अचूक निशाना साधला.
अस्त्र हे क्षेपणास्त्र हवेतून हवेत मारा करू शकणाऱ्या क्षेपणास्त्रांमध्ये उजवे आहे. या क्षेपणास्त्राची अनेकदा चाचणी घेण्यात आली होती. हे क्षेपणास्त्र हवेतून हवेत मारा करू शकणारे भारताने विकसित केलेले पहिलेच आहे. हे क्षेपणास्त्र मिराज 2000 एच, मिग 29, सी हॅरिअर, मिग 21 आणि सुखोईलाही वापरता येणार आहे.