नवी दिल्लीः संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे (डीआरडीओ)नं ओडिशामधल्या चांदीपूरमध्ये आज ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राचं यशस्वी परीक्षण घेतलं आहे. हे क्रूझ क्षेपणास्त्र जमीन, हवा आणि पाण्यातून लक्ष्याचा वेध घेऊ शकणार असून, क्षेपणास्त्राची मारक क्षमता जबरदस्त आहे. जमीन, समुद्र आणि आकाशातून मारा करणारं ब्रह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्र सध्या भारताकडे असून, चीन आणि पाकिस्तानकडे नाही.या सुपरसॉनिक क्षेपणास्त्राची मारक क्षमता वाढवण्यासाठी भारत आणि रशिया संयुक्तरीत्या प्रयत्नशील आहेत. येत्या काही दिवसांत भारत आणि रशिया मिळून या ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्राचा टप्पा 290 किलोमीटरवरून वाढवून 600 किलोमीटर करण्याच्या दिशेनं काम करत आहेत. या क्षेपणास्त्रानं पाकिस्तानच्या प्रमुख शहरांना एका झटक्यात उद्ध्वस्त करता येणं सहजशक्य आहे. ब्रह्मोस रॅमजेट इंजिनयुक्त असून, सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. या मिसाइलला पाणबुडी, जहाज, लढाऊ विमान आणि जमिनीवरून डागता येणार आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्र दिवस-रात्रीपैकी कधीही लक्ष्याचा वेध घेण्यात सक्षम आहे. रॅमजेट इंजिनच्या साहाय्यानं क्षेपणास्त्राची क्षमता तीन पटीनं वाढवणं शक्य आहे.जर एखाद्या क्षेपणास्त्राची क्षमता 100 किमी दूरपर्यंत मारा करण्याची असेल, तर त्याची क्षमता रॅमजेट इंजिनाच्या मदतीनं 320 किमीपर्यंत मारा करण्याएवढी वाढवता येऊ शकते. रशियाच्या एनपीओ मशिनोस्ट्रोयेनिया आणि भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं (DRDO)नं संयुक्तरीत्या हे क्षेपणास्त्र विकसित केलं आहे. हे क्षेपणास्त्र वजनाने हलके, लांब पल्ल्याबरोबर जास्त स्फोटके वाहून नेण्याची क्षमता असलेले आहे. तसेच लक्ष्याचा अचूक वेध घेण्यातही ते सक्षम आहे. भारत आणि रशिया यांच्या संयुक्त प्रयत्नातून ब्रह्मोस हे सुपरसोनिक क्षेपणास्त्र विकसित करण्यात आले आहे. सद्यस्थितीत हे क्षेपणास्त्र जगात सर्वाधिक वेगवान आणि लक्ष्याचा अचूक वेध घेणारे आहे. ब्रह्मोसचा पल्ला आणखी वाढवण्यात येणार आहे. ब्रह्मोस हे सध्या 300 ते 350 किलोमीटरपर्यंत डागता येऊ शकते. याचा पल्ला वाढवण्यासाठी ब्रह्मोस एम के 2 प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. याद्वारे या क्षेपणास्त्राचा वेग आणखी वाढणार असून, त्याचा पल्ला हा 600 किमीपर्यंत नेण्यात येणार आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्र हे गायडेड सुपरसॉनिक असून, याचा वेग जवळपास 2.8 मॅक एवढा आहे. एकदम कमी उंचीवरून उडण्याची क्षमता यात असून, यामुळे शत्रूच्या रडाराला चकवा देऊ शकते. ब्रह्मोस हे जमिनीवरून हवेत, हवेतून पाण्यात, पाण्यातून हवेत तसेच जमिनीवरून जमिनीवरील लक्ष्यावर डागता येऊ शकते. या पुढे भविष्यात या क्षेपणास्त्राचे वजन कमी करून तेजस एमके 1 आणि एमके 2 या विमानांवर लावली जाणार आहे. लाईट वेट ब्रह्मोसमुळे मारक क्षमता वाढणार आहे.
ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राचं यशस्वी परीक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 11:59 AM