नवी दिल्ली - जे घरमालक डॉक्टर आणि नर्सेस यांना घर सोडण्यासाठी त्रास देत आहेत. त्यांच्यावर लक्ष ठेवावे, असा आदेश दिल्ली सरकारने जिलाधिकारी, महानगर पालिका आणि पोलिसांना दिला आहे. महामारी रोग अधिनियमांतर्गत हा आदेश देण्यात आला आहे. याशिवाय डीआरडीओनेही एन-95 मास्कची उपलब्धता वाढविण्यासाठीही स्थानिक उत्पादकांसोबत काम सुरू केले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
परराष्ट्र मंत्रालय देशात आवश्यक वस्तूंची उपलब्धता वाढवण्यासाठी दक्षिण कोरिया, तुर्की आणि व्हियतनाममधील पुरवठादारांच्या संपर्कात आहे, असेही अग्रवाल यांनी सांगितले.यावेळी दिल्लीतील निजामुद्दीन प्रकरणावर बोलताना, सर्वांनी हे समजून घेण्याची आवश्यकता आहे, की ही चूक शोधण्याची वेळ नाही, मात्र, या प्रकरणात कारवाई निश्चितपणे होईल, असेही आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
सहकार्य न मिळाल्याने वाढली कोरोना रुग्णांची संख्या -
लोकांचे हवे तसे सहकार्य मिळत नसल्याने कोरोना व्हायरसच्या प्रकरणांत वाढ होत आहे. कोरोनाचा सामना आपल्या सर्वांना सोबतीने करावा लागणार आहे. संपूर्ण देश एकत्रित येऊनच कोरोनाचा पराभव करू शकतो. कोरोना संदर्भातील प्रत्येक छोटी मोठी माहिती वेबसाइटवर देण्यात आली आहे. गरीबांच्या आवश्यक गरजाही भागवल्या जात आहे, असेही लव अग्रवाल यावेळी म्हणाले.
देशभरात 123 लॅब्समध्ये सुरू आहे काम -
आयसीएमआरचे रमन गंगा खेडकर म्हणाले, आतापर्यंत आम्ही 42,788 सॅम्पलची तपासणी केली आहे. यापैकी 4,346 सॅम्पल्स सोमवारी टेस्ट करण्यात आले आहेत. देशात एकूण 123 लॅब्स यावर काम करत आहेत. सरकारने 49 लॅब्सनाही परवानगी दिली आहे. खासगी लॅबमध्ये सोमवारी 399 रुग्णांच्या सॅम्पल्सची तपासणी करण्यात आली.