बंगळुरू: संरक्षण संशोधन आणि विकास संस्था(DRDO) देशाला उपयुक्त असणारे तंत्रज्ञान विकसित करत असते. याचाच भाग म्हणून, DRDO ला अत्याधुनिक मानवरहित विमान विकसित करण्यात एक मोठे यश मिळाले आहे. DRDO ने 'ऑटोनॉमस फ्लाइंग विंग टेक्नोलॉजी डिमॉन्स्ट्रेटर'चे पहिले उड्डाण यशस्वीरित्या पार पाडले आहे. वैमानिकाशिवाय उड्डाण केलेल्या या विमानाने उड्डाण करण्यापासून ते लँडिंगपर्यंतची सर्व कामे स्वतः केली. कर्नाटकातील चित्रदुर्गातील एरोनॉटिकल टेस्ट रेंजमध्ये शुक्रवारी हे परीक्षण करण्यात आले.
डीआरडीओचे मोठे यशएएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, DRDOने निवेदनात म्हटले की, 'या वैमिनिकरहीत विमानाचे उड्डाण खूप चांगले झाले. हे उड्डाण पूर्णपणे स्वयंचलित होते. यामध्ये टेक-ऑफ, वे पॉइंट नेव्हिगेशन आणि स्मूथ टचडाउनची चाचणी घेण्यात आली. हे उड्डाण भविष्यात मानवरहित विमानाच्या विकासामध्ये मैलाचा दगड ठरेल. संरक्षण तंत्रज्ञानामध्ये आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.'
स्वदेशी बनावटीचे विमानDRDO अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या UAV चे डिझाईन DRDO अंतर्गत बंगळुरू येथील प्रमुख संशोधन प्रयोगशाळा एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (ADE) ने तयार केले आहे. त्याचा विकासही एडीईने केला आहे. हे एक छोटे मानवरहित विमान आहे. यात टर्बोफॅन इंजिन आहे. एअरफ्रेम आणि विमानाची संपूर्ण रचना, चाके, उड्डाण नियंत्रण तंत्रज्ञान आणि एव्हीओनिक्स प्रणालीदेखील पूर्णपणे स्वदेशी आहे.