NITI Ayog: भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याचे पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी NITI आयोगाने नवीन रणनीती आखली आहे. यासाठी NITI आयोग देशातील विविध शहरांची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी मोहीम सुरू राबवणार आहे. सुरुवातीला मुंबई, सुरत, वाराणसी आणि वायझॅगच्या आर्थिक परिवर्तनासाठी तयार केलेल्या योजनेवर काम केले जाईल. यानंतर देशातील प्रमुख 20 ते 25 शहरांच्या सुधारणेसाठी काम केले जाईल.
शहरी आर्थिक नियोजनNITI आयोगाने सांगितले की, पूर्वी ते फक्त शहरांसाठी शहरी योजना तयार करायचे, पण आता शहरांच्या आर्थिक नियोजनावरही काम करणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळेच NITI आयोगाने सुरुवातीला 4 शहरांसाठी आर्थिक योजना तयार करुन वेगाने यावर काम सुरू करणार आहे. NITI आयोग 2047 पर्यंत भारताला $30 ट्रिलियनची विकसित अर्थव्यवस्था बनवण्यासाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिजन डॉक्युमेंट लवकरच जारी करणार आहेत.
हे व्हिजन डॉक्युमेंट बनवण्यापूर्वी केंद्र सरकारने 11 डिसेंबर रोजी भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यासाठी देशातील तरुणांकडून सूचना मागवल्या होत्या. आत्तापर्यंत NITI आयोगाला भारतातील तरुणांकडून 10 लाखांहून अधिक सूचना प्राप्त झाल्या आहेत. AI वापरुन आयोग यावर काम करत आहे. ही संपूर्ण प्रक्रिया विद्यापीठे आणि इतर शैक्षणिक संस्थांच्या मदतीने पूर्ण करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नीती आयोगाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. यामध्ये मुंबईचा जीडीपी, म्हणजेच एमएमआर 2030 पर्यंत 300 अब्ज डॉलरवर नेण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याबाबत चर्चा करण्यात आली. 6328 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेल्या, MMR मध्ये बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पनवेलसह 9 महानगरपालिका समावेश आहे.