ओरछा : दारू नव्हे, दूध प्या, असा नारा देत भाजप नेत्या व माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी मध्य प्रदेशमधील ओरछा शहरात दारू दुकानांपुढे गायी बांधल्या व मद्यविक्री करणाऱ्यांचा अनोख्या शैलीत निषेध केला.
दारूविक्रीला मध्य प्रदेश सरकारने प्रोत्साहन देऊ नये, अशी भूमिका उमा भारती यांनी मांडली आहे. निवारी जिल्ह्यातील ओरछा हे शहर देशभरात मंदिरे व राजवाड्यांसाठी प्रसिद्ध आहे. अशा या शहरात त्यांनी दारूविरोधात आंदोलन सुरू केले आहे. या शहरातील दारूच्या दुकानासमोर त्यांनी गायी बांधल्या. ‘शराब नही, दूध पियो’ अशी घोषणा देऊन उमा भारती यांनी आसमंत दणाणून सोडला. गेल्यावर्षी जून महिन्यात त्यांनी याच दारूच्या दुकानावर शेण फेकले होते. भोपाळ येथील दारूच्या दुकानावर गेल्यावर्षी मार्च महिन्यात उमा भारतींनी दगडाचा मारा केला होता.
ओरछा येथील दारूच्या दुकानासमोर उमा भारती यांनी गायी आणून बांधल्यानंतर दुकानदार घाबरला व त्याने दुकानाचे शटर खाली ओढून घेतले. मध्य प्रदेशमधील मद्यपानाची समस्या आम्हाला संपविता आली नाही, अशी कबुली उमा भारती यांनी दिली आहे. (वृत्तसंस्था)
‘शिवराजसिंह चौहान हे धाडसी नेते’nओउमा भारती यांनी सांगितले की, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे धाडसी नेते आहेत. उत्पादन शुल्क धोरणात काही त्रुटी असल्याचे त्यांनी मान्य केले व बाबा रामदेव यांच्याशी सल्लामसलत करून या धोरणाचा नवीन मसुदा तयार करण्याचे आश्वासन दिले. नवे उत्पादन शुल्क धोरण लोकांना मद्यपानापासून परावृत्त करेल, असेही चौहान यांनी म्हटल्याची आठवण उमा भारती यांनी करून दिली. nमध्य प्रदेशात दारू विक्रीवर संपूर्ण बंदी घालावी, अशी मागणी उमा भारती यांनी याआधी केली होती. इथे वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.