खुशालचंद बाहेतीथिरूवनंतपुरम : लोकांना त्रास होणार नाही, अशा पद्धतीने खासगी जागेत दारू पिणे, हा गुन्हा ठरत नाही किंवा एखाद्याच्या तोंडाला दारूचा वास आला म्हणजे तो दारुच्या नशेत होता, असे म्हणता येणार नाही, असा निर्णय केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे.
सलीमकुमार बी. एस. याला फेब्रुवारी २०१३मध्ये केरळच्या बाटीअडका पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. वेळ सायंकाळी ७ची होती. एका गुन्ह्यात अटक केलेला आरोपी ओळखण्यास पोलिसांनी त्याला सांगितले. मात्र, सलीमकुमार बी. एस. आरोपीला ओळखू शकला नाही. त्याच्या तोंडाला दारुचा वास येत होता. म्हणजेच तो दारू प्यायलेला होता व दारुच्या नशेत पोलीस ठाण्यात (सार्वजनिक ठिकाणी) आला, असा आरोप ठेवत पोलिसांनी त्याच्याविरुद्ध ११८ (अ) केरळ पाेलीस कायद्याप्रमाणे गुन्हा नोंदवला.
या गुन्ह्यात पोलिसांनी दाखल केलेले दोषारोपपत्र रद्द करावे म्हणून सलीमकुमार यांनी केरळ उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.पोलिसांनी अल्कोमीटरने तपासणी केली; पण त्यांची वैद्यकीय तपासणी किंवा रक्ताची तपासणी केली नव्हती. त्याच्या तोंडाला दारुचा वास येत होता म्हणजे तो दारुच्या नशेत होता, असे म्हणता येणार नाही. कारण तो बोलावल्यानंतर पोलीस ठाण्यात हजर झाला. यावरुन तो नशेत नव्हता. त्याचे स्वतःवर नियंत्रण होते. त्याने खासगी ठिकाणी बसून दारू प्यायली असेल तरी त्याच्या पिण्यामुळे कोणाला त्रास, पिडा झाली नसेल तर तो गुन्हा होत नाही, असे म्हणत केरळ उच्च न्यायालयाने दोषारोप पत्र रद्द केले.