मंडी – हिमाचल प्रदेश परिवहन बसच्या चालकाला गाडी चालवताना अचानक ह्दयविकाराचा झटका आला, उपचारादरम्यान त्याने अखेरचा श्वास घेतला. मात्र ह्दयविकाराचा झटका आल्यानंतरही चालकाने प्रसंगवधान राखत बसमध्ये प्रवास करत असलेल्या ३५ प्रवाशांचे प्राण वाचवत त्यांना सुरक्षित ठेवलं, आयुष्याच्या अखेरच्या क्षणी बसचालकाने केलेल्या या कार्यामुळे अनेकांना जीवदान मिळाले.
माहितीनुसार, ही घटना सरकाघाट उपविभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सधोट गावाजवळ घडली, सरकाघाट डेपोमध्ये कार्यरत असणारे बसचालक श्याम लाल नेहमीप्रमाणे सकाळी त्यांच्या ड्युटीवर हजर झाले. त्यानंतर सरकाघाट ते अवाहदेवी या मार्गावर जाणाऱ्या बसचं काम त्यांच्याकडे दिलं. सधोट गावाजवळ पोहचताच अचानक श्याम लालच्या छातीत दुखू लागले. त्यानंतर बसवरील त्यांचे नियंत्रण सुटले. काही मिनिटात बसला रस्त्यात हादरे बसू लागले, आतमध्ये बसलेले प्रवाशी भीतीनं सैरवैर झाले.
अशा परिस्थितीतही श्याम लालने हिंमत हरली नाही त्यांनी बसवर नियंत्रण मिळवत बस थांबवली, आणि सगळ्या प्रवाशांना उतरण्यास सांगितले. यानंतर श्याम लाल चालकाच्या जागेवरच बेशुद्ध झाले. घटनास्थळी असलेल्या प्रवाशांनी सरकाघाट येथील बस डेपो येथे सूचना दिली, त्यानंतर विभागीय अधिकाऱ्यांनी सरकाघाट येथून दुसरी बस घटनास्थली पाठवण्यात आली, श्याम लाल यांना उपचारासाठी हॉस्पिटलला हलवण्यात आले. मात्र श्याम लाल यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना हमीरपूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान श्याम लाल यांची प्राणज्योत मालावली