अहमदाबादः जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आयएएसच्या परीक्षेत यशाचं शिखर सर केलेल्या तरुणांच्या कहाण्या प्रेरणा देऊन जात असतानाच, गुजरातमधील एका ड्रायव्हरच्या मुलाने आयआयएमच्या प्रवेश परीक्षेत घवघवीत यश मिळवून आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवली आहे. हितेश सिंह असं या तरुणाचं नाव असून अहमदाबाद आयआयएममध्ये तो फूड अँड अॅग्रो बिझनेस मॅनेजमेंटचे धडे गिरवणार आहे. अमूलचे व्यवस्थापकीय संचालक आर एस सोधी यांच्याकडे हितेशचे वडील ड्रायव्हर म्हणून काम करतात.
पंकज सिंह हे मूळचे बिहारचे. नोकरीसाठी ते गुजरातमध्ये आले आणि ड्रायव्हर म्हणून काम करू लागले. आपले 'बॉस' आर. एस. सोधी यांना घेऊन ते अनेकदा अहमदाबादच्या आयआयएममध्ये गेलेत. सोधी हे तिथे गेस्ट लेक्चरर आहेत. त्यांना कॉलेजमध्ये घेऊन जाताना, आपल्या मुलाने - हितेशने इथे शिकायला हवं, असं पंकज सिंह यांना मनोमन वाटायचं. बापाची ही इच्छा मुलाने नेमकी हेरली आणि त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्याचं गोड फळ त्याला मिळालं. कॉमन अॅप्टिट्यूड टेस्टमध्ये (CAT) हितेशने ९६.१२ टक्के गुण मिळवले आणि मुलाखतीतही तो उत्तीर्ण झाला. मुलाच्या या यशाने पंकज सिंह आणि कुटुंबीयांचा आनंद गगनात मावत नाहीए.
हितेशला डेअरी सेक्टरमध्ये करिअर करायचं आहे. आर. एस. सोधी हे त्याचे आदर्श आहेत. एका खोलीच्या घरात राहून, पालिकेच्या शाळेत शिकून सोधी यांनी अमूलच्या एमडी पदापर्यंत केलेला प्रवास हितेशला प्रेरणा देतो. आता त्याच्या शिक्षणासाठी २३ लाख रुपये लागणार आहेत. परंतु, मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी बाप काहीही करायला तयार आहे. गरिबीवर मात करून, चिकाटीच्या जोरावर आपण यश मिळवू शकतो, हेच हितेशनं दाखवून दिलंय. अर्थातच, त्याच्या पंकज सिंह आणि कुटुंबीयांचा सिंहाचाच वाटा आहे.